Sat. Jun 13th, 2026

अकोले | निखिल चौधरी

अकोले तालुक्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीच्या व्यवसायाविरोधात गेल्या काही दिवसांपासून कारवाईचा धडाका सुरू असून, आमदार डॉ. किरण लहामटे आणि त्यांच्या पत्नी पुष्पाताई लहामटे यांनी स्वतः पुढाकार घेत विविध ठिकाणी छापेमारी मोहीम राबविली आहे. या कारवाईत हजारो रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

अवैध दारूविक्रीमुळे युवकांमध्ये वाढणारी व्यसनाधीनता, कौटुंबिक कलह आणि सामाजिक समस्या लक्षात घेऊन आमदार लहामटे यांनी पोलिस प्रशासनाच्या मदतीने अनेक ठिकाणी धाडसत्र सुरू केले आहे.

दोन दिवसांपूर्वी निळवंडे मार्गे सांगवीकडे जात असताना निळवंडे परिसरात संशयास्पद गर्दी दिसल्याने त्यांनी तेथे थांबून चौकशी केली. यावेळी काही युवकांनी घटनास्थळावरून पळ काढल्याने संशय अधिक बळावला. त्यानंतर प्रत्यक्ष पाहणी केली असता तेथे अवैध दारूविक्री सुरू असल्याचे उघडकीस आले.

यापूर्वीही आमदार लहामटे यांनी तालुक्यातील विविध भागांमध्ये अशाच प्रकारच्या कारवाया करून अवैध धंद्यांना आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, त्यांच्या पत्नी पुष्पाताई यांनी देखील राजूर परिसरातील काही अवैध दारूविक्री केंद्रांवर धाड टाकून संबंधित प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला होता.

गेल्या दोन ते तीन दिवसांत झालेल्या या कारवायांमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, अनेक ठिकाणी सुरू असलेल्या अशा धंद्यांवर प्रशासनाने अधिक कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. मात्र, काही भागांमध्ये अजूनही अवैध दारूविक्री सुरू असल्याची चर्चा असून, संबंधित यंत्रणांनी व्यापक मोहीम राबवून अशा व्यवसायांचे संपूर्ण उच्चाटन करावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

अवैध दारूविक्रीविरोधात लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने संयुक्तपणे उचललेले हे पाऊल समाजहिताचे असून, तालुक्याला व्यसनमुक्त करण्याच्या दृष्टीने ही मोहीम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याची गरज व्यक्त होत आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!