अकोले, प्रतिनिधी :
अकोले तालुक्यातील औरंगपूर फाटा येथे बुधवारी दुपारी दुचाकीवरून वाहतूक करण्यात येणाऱ्या स्फोटक पदार्थांचा अचानक भीषण स्फोट झाल्याने एक जण गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप उत्तम ताजने (रा. औरंगपूर) हे दुचाकीवरून स्फोटक पदार्थ घेऊन जात असताना औरंगपूर फाट्याजवळ अचानक स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की दुचाकी हवेत उडाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. स्फोटानंतर परिसरात धुराचे लोट पसरले होते.
घटनेची माहिती मिळताच अकोले पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्फोटाचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक येथील बॉम्ब शोध व नाश पथक (BDDS) तसेच फॉरेन्सिक विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. पथकाने घटनास्थळाची पाहणी करून तपासासाठी आवश्यक नमुने संकलित केले आहेत.
या प्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून स्फोटकांचा स्रोत, त्यातील रसायने आणि इतर संबंधित बाबींचा सखोल तपास सुरू आहे. पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात संबंधित व्यक्ती बेकायदेशीर मासेमारीसाठी या स्फोटकांचा वापर करत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
