संगमनेर (प्रतिनिधी):
महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सुरू करण्यात आलेली ‘पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड’ योजनेच्या माध्यमातून नियमित कर्जफेड करणाऱ्या पशुपालकांना शून्य टक्के व्याजदराने ३ लाख रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य उपलब्ध होणार असल्याची माहिती संगमनेर विधानसभेचे आमदार अमोल खताळ यांनी दिली आहे.
ही योजना पशुपालकांसाठी मोठी आर्थिक संजीवनी ठरणार आहे. तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा असलेल्या पशुपालकांना आणि दुग्धव्यावसायिकांना सावकारी पाशातून मुक्त करण्यासाठी, त्यांच्या व्यवसायाला भक्कम आर्थिक पाठबळ देण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.
संगमनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी दुग्धव्यवसाय आणि पशुपालनावर अवलंबून आहेत. पशुधनाची दैनंदिन देखभाल, चारा आणि इतर व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांना नेहमीच खेळत्या भांडवलाची गरज भासते. हीच गरज ओळखून शासनाने ही विशेष मोहीम हाती घेतली. या योजनेचा लाभ केवळ दुग्धव्यवसाय करणाऱ्यांनाच नव्हे, तर शेळी-मेंढीपालन, कुक्कुटपालन आणि वराहपालन करणाऱ्या सर्व घटकांना मिळणार असल्याचे आमदार खताळ यांनी स्पष्ट केले.
ज्या शेतकऱ्यांकडे अद्याप किसान क्रेडिट कार्ड नाही, त्यांना १ लाख ६० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज कोणत्याही तारणाशिवाय मिळणार आहे. संबंधित शेतकरी दूध संस्थेचा सभासद असल्यास ही विनातारण मर्यादा दूध संस्थेच्या हमीवर ३ लाख रुपयांपर्यंत वाढवता येणे शक्य आहे. तसेच ज्यांच्याकडे आधीपासूनच किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध आहे, त्यांनाही आपली पतमर्यादा ३ लाखांपर्यंत वाढवून घेण्याची तरतूद या योजनेत करण्यात आली आहे.
या योजनेतील व्याज सवलतीचे गणित अत्यंत फायदेशीर आहे. बँकेचा मूळ व्याजदर ९ टक्के असला तरी, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार ३ टक्के आणि राज्य शासन ४ टक्के अशी एकूण ७ टक्के व्याज सवलत देत आहे. त्यातच बँकांनाही २ टक्के व्याज सवलत मिळाल्यामुळे, वेळेवर कर्जाची परतफेड करणाऱ्या पशुपालकांना हे कर्ज पूर्णपणे शून्य टक्के व्याजदराने उपलब्ध होणार आहे.
दूध सोसायटी, दूध संघ किंवा दूध उत्पादक कंपन्यांचे सभासद असलेल्या ज्या पशुपालकांनी अद्याप या योजनेचा लाभ घेतलेला नाही, त्या सर्व पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. योजनेच्या अधिक माहितीसाठी व अर्ज प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांनी आपल्या नजीकच्या सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा किंवा ‘१९६२’ या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करावा, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
