अहिल्यानगर – अहिल्यानगर जिल्ह्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रशासकीय तयारीला वेग आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी शासकीय निकषांनुसार निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नेमणुकीस नुकतीच मंजुरी दिली आहे.
निवडणुका शांततेत आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी प्रशासकीय सेवेतील अनुभवी अधिकारी, यात उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि मुख्याधिकारी यांची निवड करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सर्व नियुक्त अधिकाऱ्यांनी राज्य निवडणूक आयोगाचे नियम आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशांचे तंतोतंत पालन करून नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुका २०२५ शांततेत, पारदर्शकतेने व सुव्यवस्थित पार पाडाव्यात, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. या नेमणुकांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया आता लवकरच गतिमान होईल, असे स्पष्ट झाले आहे.
प्रमुख नगरपरिषदांसाठी नियुक्त अधिकारी
- संगमनेर: उपविभागीय अधिकारी अरुण ऊंडे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक झाली असून, त्यांना धीरज मांजरे आणि श्रीमती धनश्री पवार हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मदत करतील.
- कोपरगाव: उपजिल्हाधिकारी श्रीमती भारती सागरे या निवडणूक निर्णय अधिकारी असतील. त्यांना महेश सावंत व सुहास जगताप मदत करतील.
- श्रीरामपूर: उपविभागीय अधिकारी किरण सावंत पाटील निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळतील. त्यांना मिलींदकुमार वाघ व मच्छिंद्र घोलप सहायक म्हणून नेमले आहेत.
- जामखेड: उपविभागीय अधिकारी नितिन पाटील यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक झाली आहे. अजय साळवे आणि मच्छिंद्र पाडळे सहायक म्हणून काम पाहतील.
- शेवगाव: उपविभागीय अधिकारी प्रसाद मते यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक झाली असून, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आकाश दहाडदे आणि श्रीमती विजया घाडगे यांची नियुक्ती झाली आहे.
- पाथर्डी: उपजिल्हाधिकारी सुभाष दळवी यांची निवड निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून झाली आहे, तर उध्दव नाईक आणि दिग्विजय पाटील सहायक म्हणून कार्यभार पाहतील.
- राहाता: उपजिल्हाधिकारी श्रीमती मनिषा राशीनकर यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक झाली असून, अमोल मोरे व वैभव लोंढे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी असतील.
- राहुरी: उपजिल्हाधिकारी अनुपसिंह यादव हे निवडणूक निर्णय अधिकारी असतील, तर नामदेव पाटील आणि सोपान बाचकर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नेमले गेले आहेत.
- देवळाली प्रवरा: उपजिल्हाधिकारी श्रीमती गौरी सावंत यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवड झाली असून, ऋषिकेश पाटील व डी.पी. शेकटकर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी असतील.
- नेवासा (नगरपंचायत): उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक झाली आहे. त्यांना संजय बिरादार व निखिल फराटे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मदत करतील.
- शिर्डी: उपविभागीय अधिकारी माणिक आहेर हे निवडणूक निर्णय अधिकारी असतील. सतिश दिघे आणि बी.बी. मुळे यांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.
- श्रीगोंदा: उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कार्यभार पार पाडतील, तर सचिन डोंगरे व श्रीमती पुष्पगंधा भगत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमले गेले आहेत.
