Sat. May 30th, 2026

महासंगम न्यूज ऑनलाईन

संगमनेर – निवडणूक आयोगाने नेमलेल्या स्थायी सर्वेक्षण पथकाने (SST) संगमनेर शहरातून एक मोठी कारवाई करत तब्बल एक कोटी रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैशांच्या गैरवापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमलेल्या पथकाने शनिवारी (१५ नोव्हेंबर २०२५) दुपारच्या सुमारास खांडगावनजीकच्या जुन्या महामार्गावरील तपासणी नाक्यावर ही कारवाई केली.

रायतेवाडीकडून संगमनेरकडे येणाऱ्या एका स्विफ्ट डिझायर (क्र. MH 25 AS 8851) कारची कसून तपासणी केली जात असताना, पथकाला एका बॅगेत ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल आढळून आले. जप्त केलेली एकूण रक्कम एक कोटी रुपये असल्याचे स्पष्ट झाले. निवडणुकीच्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड आढळल्याने संगमनेर शहरात एकच खळबळ उडाली आहे.

कारमधील दोन व्यक्तींकडे या रकमेबद्दल विचारणा केली असता, त्यांना त्वरित कोणतीही अधिकृत कागदपत्रे सादर करता आली नाहीत. मात्र, त्यांनी प्राथमिक चौकशीत ही रक्कम धाराशिव येथील ‘अजमेरा कन्स्ट्रक्शन’ या बांधकाम कंपनीची असल्याचा दावा केला. कंपनीचे ‘जय साई कंट्रक्शन’ मार्फत निळवंडे धरणाच्या कालव्याचे (कॅनॉल) काम सुरू असून, ही रक्कम कामावरील मजुरांचे पगार आणि वाहनांसाठी डिझेल खरेदी करण्याकरिता घेऊन जात असल्याचे स्पष्टीकरण चालकाने व त्याच्या सहकाऱ्याने पोलिसांना दिले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासणीनुसार, या रकमेचा निवडणुकीशी थेट संबंध नसल्याचे दिसून येत आहे. तथापि, भरारी पथक कारमधील व्यक्तींनी केलेल्या दाव्याची सत्यता आणि रकमेच्या स्त्रोताची सखोल पडताळणी करत आहे. सायंकाळी उशिरापर्यंत पुढील कारवाईबाबत वरिष्ठांकडून आदेश प्राप्त न झाल्याने, जप्त केलेली रक्कम नेमकी कुठे आणि कशी जमा करायची याबद्दल पथक आदेशाच्या प्रतीक्षेत होते. निवडणुकीच्या रणधुमाळीत जप्त झालेल्या या ‘कॅश’च्या स्त्रोताबद्दल आणि अंतिम उद्देशाबद्दल आता सखोल तपास सुरू आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!