Sat. May 30th, 2026

संगमनेर (प्रतिनिधी):

संगमनेर तालुक्यातील पिंपळे येथील पाझर तलावातून चिंचोली गुरव आणि पारेगाव या दोन्ही गावांतील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी जलसंपदा विभागाच्या वतीने रब्बीचे आवर्तन सोडण्यात आले आहे. आमदार अमोल खताळ यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन जलसंपदा विभागाला तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यांच्या या पुढाकारामुळे रब्बी हंगामातील धोक्यात आलेली पिके वाचणार असून, परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यावर्षी परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने पिंपळे पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पाणी उपलब्ध नसल्याने चिंचोली गुरव व पारेगाव परिसरातील रब्बी हंगामातील गहू, हरभरा व इतर पिके पाण्याअभावी धोक्यात आली होती. ही पिके वाचवण्यासाठी तलावातून तात्काळ पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. या संदर्भात शिवसेनेचे तालुका प्रमुख राजेंद्र सोनवणे, संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य रविदास सोनवणे तसेच पारेगाव येथील भाजपचे सुरेश दळवी यांनी आमदार अमोल खताळ यांची भेट घेऊन त्यांना निवेदनाद्वारे परिस्थितीची कल्पना दिली होती.

शेतकऱ्यांची ही गंभीर समस्या लक्षात घेऊन आमदार खताळ यांनी विलंब न लावता जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले. पिंपळे पाझर तलावातून दोन्ही गावांसाठी रब्बी हंगामाचे आवर्तन तात्काळ सुरू करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. आमदारांच्या या सूचनेनंतर जलसंपदा विभागाने वेगवान हालचाली करत शुक्रवारी, ९ जानेवारी रोजी प्रत्यक्ष पाणी सोडण्याची कार्यवाही पूर्ण केली.

यावेळी पाणी पूजन व आवर्तन सोडण्याच्या प्रसंगी शिवसेनेचे तालुका प्रमुख राजेंद्र सोनवणे, रविदास सोनवणे, दगेश सोनवणे, सचिन आभाळे, बाबासाहेब माळी, खंडेराव सोनवणे, संभाजी सोनवणे, आबा सोनवणे, अमोल सोनवणे, रमण गडाख, सुरेश गडाख, किशोर गडाख यांच्यासह चिंचोली गुरव व पारेगाव येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तलावातून पाणी सुटल्यामुळे दोन्ही गावांतील पिकांना नवसंजीवनी मिळाली असून शेतकऱ्यांमधील चिंतेचे सावट दूर झाले आहे. ऐन गरजेच्या वेळी आमदार अमोल खताळ यांनी वैयक्तिक लक्ष घालून पाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल चिंचोली गुरव आणि पारेगावच्या ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी त्यांचे विशेष आभार मानले आहेत. वेळेवर मिळालेल्या या पाण्यामुळे आता रब्बीचा हंगाम यशस्वी होईल, असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!