Fri. May 29th, 2026

संगमनेर – सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेने वेग घेतला आहे. या पार्श्वभूमीवर, संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांसाठीच्या राखीव जागांची आरक्षण सोडत सोमवारी (१३ ऑक्टोबर) काढण्यात येणार आहे, अशी माहिती संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

संगमनेर तालुक्यात जिल्हा परिषदेचे ९ गट आणि पंचायत समितीचे १८ गण आहेत. जिल्हा परिषदेच्या ९ गटांमध्ये समनापुर, तळेगाव, आश्वी बुद्रुक, जोर्वे, घुलेवाडी, धांदरफळ बुद्रुक, चंदनापुरी, बोटा आणि साकुर या गटांचा समावेश आहे. तर पंचायत समितीच्या १८ गणांमध्ये निमोण, समनापुर, तळेगाव, वडगाव पान, आश्वी बुद्रुक, आश्वी खुर्द, जोर्वे, अंभोरे, घुलेवाडी, गुंजाळवाडी, राजापूर, धांदरफळ बुद्रुक, संगमनेर खुर्द, चंदनापुरी, खंदळमाळवाडी, बोटा, पिंपळगाव देपा आणि साकुर या गणांचा समावेश आहे.

ही आरक्षण सोडत सोमवारी, १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता यशवंतराव चव्हाण प्रशासकीय इमारतीतील सभागृहात (प्रांत ऑफिस) काढली जाणार आहे. या सोडतीमध्ये जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (ओबीसी) आणि त्यामधील स्त्रियांसाठी तसेच सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केल्या जाणार आहेत. या महत्त्वपूर्ण सभेसाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती कार्यक्षेत्रातील सर्व रहिवाशांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार मांजरे यांनी केले आहे.

याव्यतिरिक्त, राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केल्यानुसार, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गट-गणांची प्राप्त झालेली प्रारूप मतदार यादी गटविकास अधिकाऱ्यांकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मतदार यादीवरील हरकती व सूचना आजपासून १४ ऑक्टोबर पर्यंत दाखल करता येणार आहेत. हरकती संगमनेर तहसील कार्यालयातील ग्रामपंचायत निवडणूक शाखेत दाखल करता येतील, अशीही माहिती तहसीलदार धीरज मांजरे यांनी दिली आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!