Fri. May 29th, 2026

संगमनेर – नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी संगमनेर शहराचे वाढते विद्रूपीकरण थांबवण्यासाठी ‘एक संगमनेरकर’ म्हणून कळकळीचा पुढाकार घेतला आहे. शहरात अनधिकृतपणे लावण्यात आलेल्या फ्लेक्स, कमानी, झेंडे आणि पोस्टरमुळे शहराचे सौंदर्य हरवत चालल्याबद्दलची तीव्र खंत व्यक्त करत तांबे यांनी गुरुवारी (९ ऑक्टोबर) संगमनेर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे. या पत्राच्या अनुषंगाने मुख्याधिकारी धनश्री पवार नेमकी काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आमदार तांबे यांनी हे पत्र त्यांच्या आमदारकीच्या भूमिकेतून नव्हे, तर ‘एक संगमनेरकर’ म्हणून लिहिले आहे. विशेष म्हणजे, या विद्रूपीकरणासाठी ते स्वतः देखील काही प्रमाणात दोषी असल्याची प्रांजळ कबुली त्यांनी दिली आहे. राजकीय स्पर्धेत नाईलाजाने आवडत नसतांनाही अशा गोष्टी कराव्या लागतात, असे त्यांनी स्पष्ट केले.

संगमनेर हे केवळ शहर नसून ती आपली संस्कृती, ओळख आणि गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या जनतेचे घर आहे. शहराला आधुनिक बनवण्यात डॉ. सुधीर तांबे (माजी नगराध्यक्ष), शहर स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी दुर्गा तांबे (माजी नगराध्यक्ष) आणि शहराला पाण्याची सोय उपलब्ध करून लक्ष्मी रोड (कॉलेज रोड) चौपदरी करून ओळख निर्माण करणारे लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे या शहरावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या मनात ‘आपल्या शहराचं रूप बेशिस्त फ्लेक्सच्या गर्दीत हरवत चाललं आहे!’ अशी अस्वस्थता असल्याचे तांबे यांनी नमूद केले.

गेल्या काही दिवसांपासून संगमनेर शहर आणि तालुक्यात अवैध फ्लेक्सचा सुळसुळाट झाला आहे. मोठमोठे फ्लेक्स, झेंडे लावताना आनंद नव्हे, तर उलट वेदना होतात, असे तांबे यांनी पत्रात नमूद केले आहे. या अनधिकृत जाहिरातबाजीमुळे शहराचा दर्शनी भाग, रस्ते, चौक, बसस्थानक, मोठमोठ्या इमारती, मंदिरे आणि धार्मिक स्थळांचे सौंदर्यसुद्धा झाकोळून टाकले आहे. ‘कमानीवर कमानी, फ्लेक्सवर फ्लेक्स’ लावून शहरात गोंधळ निर्माण झाला आहे.

यामुळे राजकीय तणाव आणि वाद वाढत असून, फ्लेक्स फाडण्याच्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. शहराचे शांत आणि सुसंस्कृत वातावरण बिघडत असून, हे विद्रुपीकरण आता थांबायलाच हवे, अशी आग्रही मागणी आमदार तांबे यांनी केली आहे.

आमदार तांबे यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे आग्रहाची आणि तळमळीची विनंती करत, ताबडतोब शहरात लावलेले सर्व अवैध फ्लेक्स, कमानी, झेंडे आणि पोस्टर काढून ‘लाडक्या संगमनेर शहराचं बिघडलेलं सौंदर्य पुन्हा परत आणण्याची’ मागणी केली आहे. या शिस्तीची सुरुवात त्यांनी स्वतःपासून करत असल्याचे जाहीर केले आहे. आपले जेवढे अवैध फ्लेक्स शहरात असतील, ते मी स्वतः तात्काळ काढणार असून, एखादा राहिल्यास प्रशासनाने तो बिनधास्त काढून टाकावा, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

भविष्यात विद्रूपीकरण होऊ नये यासाठी प्रशासनाने तातडीने फ्लेक्स/झेंडे/पोस्टर लावण्यासाठी योग्य जागा निश्चित करून द्यावी, अशी विनम्र सूचना तांबे यांनी केली आहे. तसेच, परवानगीशिवाय किंवा निश्चित केलेल्या जागांव्यतिरिक्त इतरत्र फ्लेक्स लावल्यास सक्त मनाई करून गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

प्रशासनाने ‘पाठीचा कणा’ दाखवत ही शिस्त आणि आचारसंहिता लागू केल्यास, आपण आणि सर्व राजकीय नेते-कार्यकर्ते, व्यावसायिक तसेच तमाम संगमनेरकर ती निश्चितपणे पाळू, अशी ग्वाही तांबे यांनी दिली आहे. “चला, आपल्या शहराला पुन्हा एकदा स्वच्छ, सुंदर आणि गर्व वाटावा असं बनवूया,” असे आवाहन त्यांनी केले आहे. या पत्राची प्रत त्यांनी माहितीसाठी अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनाही पाठवली आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!