संगमनेर:
संगमनेर नगरपालिकेने शहरात, विशेषतः नवीन नगर रोड परिसरात राबवलेली अतिक्रमण हटाव मोहीम अत्यंत अन्यायकारक आणि भेदभाव करणारी असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांनी केला आहे.
प्रशासनाच्या या भूमिकेमुळे स्थानिक कष्टकरी आणि छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली असून, या अन्यायाविरोधात शिवसेनेने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. यासंदर्भात अमर कतारी यांनी नगराध्यक्ष मैथिलीताई तांबे आणि मुख्याधिकारी दयानंद गोरे यांना लेखी निवेदन देऊन प्रशासकीय कारवाईवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
अमर कतारी यांनी आपल्या निवेदनात प्रशासनाच्या दुटप्पी धोरणावर प्रहार केला आहे. नगरपालिकेने केवळ ठराविक भागातील गरिबांच्या पोटावर पाय दिला असून शहरातील इतर भागांतील अतिक्रमणे अद्यापही तशीच असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. मोठ्या इमारतींकडे पार्किंगची सोय नसल्याने धनदांडगे ग्राहक रस्त्यावर वाहने उभी करतात, मात्र प्रशासन केवळ ते श्रीमंत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यास धजावत नाही. याउलट स्थानिक दुकानदार, शेतकरी, भाजीपाला विक्रेते आणि चहा टपरीधारकांवर कारवाई करून त्यांचे संसार उघड्यावर पाडण्याचे काम नगरपालिका करत असल्याचे कतारी यांनी म्हटले आहे.
प्रशासनाच्या कारवाईत प्रादेशिक भेदभाव होत असल्याचा आरोपही या निवेदनात करण्यात आला आहे. स्थानिक मराठी माणसाचा पिढ्यानपिढ्या चालत आलेला व्यवसाय बंद केला जात असताना, परराज्यातून आलेल्या पाणीपुरी, मोमोज आणि चायनीज विक्रेत्यांवर मात्र कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. दुपारी ४ नंतर हे परप्रांतीय विक्रेते रस्त्यांवर उघडपणे व्यवसाय थाटतात, ज्यामुळे वाहतुकीची कोंडी आणि शिस्तीचा प्रश्न निर्माण होतो. काही ठिकाणी तर चायनीज आणि ऑम्लेटच्या गाड्यांवर मद्यपानासारखे अवैध प्रकार घडत असून प्रशासनाने याला जणू मूकसंमतीच दिली आहे की काय, असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.
शिवसेनेने या निवेदनाद्वारे नगरपालिकेला स्पष्ट मागणी केली आहे की, या अन्यायकारक कारवाईला तात्काळ स्थगिती देण्यात यावी. ज्या छोट्या व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे, त्यांना व्यवसायासाठी पर्यायी आणि हक्काची जागा उपलब्ध करून देऊन त्यांचे पुनर्वसन करावे. संपूर्ण संगमनेर शहरात कोणत्याही राजकीय दबावाखाली न येता किंवा पक्षपाती भूमिका न घेता समान पद्धतीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
प्रशासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास येणाऱ्या काळात स्थानिक नागरिक आणि अन्यायग्रस्त दुकानदारांच्या कुटुंबांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने नगरपालिकेच्या प्रांगणात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा अमर कतारी यांनी दिला आहे. यामुळे आता नगरपालिका प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.


