अहिल्यानगर:
‘शिक्षक भारती’ संघटनेने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि आक्रमक आंदोलनामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील न्यायालयीन थकीत वेतन देयके मंजूर झाली आहेत. संघटनेचे पुणे विभाग कार्याध्यक्ष प्रा. महेश पाडेकर यांच्या नेतृत्वाखाली हा लढा यशस्वी झाला असून, यामुळे जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शिक्षक भारती संघटनेने गेल्या दोन वर्षांपासून थकीत वेतनाचा प्रश्न प्राधान्याने लावून धरला होता. यासाठी संघटनेने वेळोवेळी प्रशासनाकडे निवेदने दिली, तसेच आंदोलनाद्वारे प्रशासनावर दबाव निर्माण केला होता. ऑक्टोबर २०२५ मध्ये शिक्षण संचालक कार्यालय, पुणे येथे केलेले विराट धरणे आंदोलन आणि नुकतेच मार्च २०२६ मध्ये शिक्षण आयुक्तालय, पुणे येथे केलेले ‘आक्रोश आंदोलन’ यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले. या आंदोलनांची दखल घेऊन प्रशासनाने अखेर देयके मंजूर करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे.
या संपूर्ण लढ्यात प्रा. महेश पाडेकर यांनी न्यायालयीन तांत्रिक बाबी आणि प्रशासकीय स्तरावर प्रभावी मांडणी केली. वेतन हा शिक्षकांचा घटनात्मक हक्क असल्याचे स्पष्ट करत त्यांनी तो मिळवून देण्यासाठी जिद्दीने प्रयत्न केले. देयके मंजूर झाल्यामुळे शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, हा विजय संघटनेच्या एकजुटीचा असल्याचे सांगितले जात आहे.
या यशावर प्रतिक्रिया देताना प्रा. महेश पाडेकर म्हणाले की, हे यश केवळ एका व्यक्तीचे नसून, लढा सुरू असताना खांद्याला खांदा लावून उभे राहिलेल्या प्रत्येक शिक्षकाचे आहे. प्रशासनाने आता उर्वरित देयकेही विनाविलंब निकाली काढावीत, अन्यथा संघटनेचा लढा असाच सुरू राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
हे यश संपादन करण्यासाठी राज्य सचिव सुनील गाडगे, विभागीय कार्याध्यक्ष महेश पाडेकर, उच्च माध्यमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष रामराव काळे, महिला जिल्हाध्यक्षा रूपाली कुरुमकर, जिल्हा उपाध्यक्ष संजय तमनर, सचिन जासूद, दादासाहेब कदम, कोषाध्यक्ष गोपाळ दराडे, संघटक चंद्रशेखर हासे, प्रवीण काळे, सहसचिव राहुल कानवडे, तालुका अध्यक्ष सुमंत शिंदे, नरेंद्र लहिरे, साई थोरात, संपत वाळके, दिगंबर देसाई, रूपालीताई बोरुडे, सचिव वंदना जाधव, कल्पना चौधरी, मफीज इनामदार, दीपक फापाळे, गणपत धुमाळ, विजय पांडे, अमोल तळेकर, संतोष नवले, बाबासाहेब तांबे, अकील फकीर, बाबाजी लाळगे, वैभव चोथे, प्रवीण मालुंजकर आणि श्याम जगताप आदी पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.


