Sat. May 30th, 2026

संगमनेर-
तालुक्यातील वडगाव पान येथे एका शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या अमानुष ॲसिड हल्ल्याचे पडसाद संपूर्ण तालुक्यात उमटत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ आज संगमनेर शहरात सुवर्णकार समाजाच्या वतीने भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनामुळे शहरात संतापाची लाट पाहायला मिळाली, तर पीडितेच्या न्यायासाठी हजारो हात एकवटले.
शहरातील प्रमुख बाजारपेठ, सय्यदबाबा चौक आणि मेनरोड या मार्गावरून हा मोर्चा काढण्यात आला. अत्यंत संवेदनशील वातावरणात निघालेल्या या मोर्चामध्ये सहभागी नागरिक, व्यापारी आणि महिलांनी कोणतीही घोषणाबाजी न करता शांततेत चालत आपला तीव्र संताप व्यक्त केला. सुवर्णकार समाज संघटनेसह सराफ असोसिएशन, विविध व्यापारी संघटना आणि सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
हा मोर्चा प्रांत कार्यालय आणि पोलीस ठाण्यावर धडकल्यानंतर पोलीस निरीक्षक समीर बारवकर आणि नायब तहसीलदार माळवे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात प्रामुख्याने अज्ञात आरोपीचा शोध घेऊन त्याला त्वरित बेड्या ठोकण्याची, तसेच त्याच्यावर पोक्सो आणि भारतीय न्याय संहितेच्या अत्यंत कठोर कलमांखाली गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे. हे कृत्य अत्यंत क्रूर असल्याने आरोपीला फाशीचीच शिक्षा व्हावी, असा आक्रमक पवित्रा सुवर्णकार समाजाने निवेदनाद्वारे घेतला आहे.
भावनांनी हेलावला परिसर
या मूक मोर्चामध्ये जखमी मुलीचे नातेवाईक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिलांच्या डोळ्यांतील अश्रू आणि चेहऱ्यावरील संताप पाहून संपूर्ण संगमनेर शहर हेलावून गेले होते. अशा नराधमांना समाजात जागा नाही, प्रशासनाने जलदगतीने तपास करून कठोर पावले उचलावीत, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. वडगाव पान येथील या घटनेने महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, पोलीस या प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर करत आहेत.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!