संगमनेर:
शहराच्या अस्मितेचा आणि गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा प्रश्न आता मार्गी लागला आहे. संगमनेर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत यासंदर्भातील महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला असून, शहरवासीयांनी दिलेल्या कौलानुसार बसस्थानक परिसरात महाराजांचे भव्य ‘पूर्णाकृती अश्वारूढ स्मारक’ उभारले जाणार असल्याचे आता निश्चित झाले आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या स्मारकाचा प्रवास संघर्षाचा आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा राहिला आहे. २०१८ मध्ये तत्कालीन नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी बसस्थानक परिसरातील मोक्याची जागा स्मारकासाठी मिळावी अशी मागणी करत या प्रक्रियेला सुरुवात केली होती. तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी हा प्रस्ताव शासनदरबारी मांडला, मात्र एसटी महामंडळाच्या तांत्रिक अडचणींमुळे हा विषय दीर्घकाळ रखडला होता. अखेर २०२३ मध्ये आमदार सत्यजीत तांबे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेल्या विशेष पाठपुराव्यामुळे ही जागा ‘विशेष बाब’ म्हणून नगरपालिकेकडे वर्ग करण्यात आली. या सहकार्याबद्दल संगमनेरकरांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.
स्मारकाच्या स्वरूपाबाबत पारदर्शक निर्णय घेण्यासाठी नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जनमत चाचणी घेण्यात आली.
५ ते ७ मार्च दरम्यान झालेल्या या प्रक्रियेत १२ हजारहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. यामध्ये ६ हजार ५६४ नागरिकांनी अश्वारूढ स्मारकाला पहिली पसंती दिली, तर उभ्या आणि सिंहासनाधीश्वर स्मारकासाठी अनुक्रमे ४ हजार ७६१ आणि ७६१ मते पडली. जनमताचा हा कौल स्वीकारून नगरपालिकेने अश्वारूढ स्मारकाचा ठराव मंजूर केला.
आमदार सत्यजीत तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भव्य स्मारकासाठी अंदाजे दीड कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा निधी लोकसहभाग आणि शासकीय मदतीतून उभा केला जाणार असून, हे स्मारक शहराच्या वैभवात भर घालणारे आणि येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देणारे ठरेल. ठराव मंजूर झाल्यामुळे आता प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार असून शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.


