संगमनेर:
मध्य प्रदेशातील मोठी धरणे १० वर्षांत पूर्ण होतात, मग निळवंडे धरणाला ५२ वर्षे का लागली? समन्यायी पाणी वाटपाच्या नावाखाली संगमनेरच्या हक्काच्या पाण्यावर कायम अन्याय झाला असून, हा प्रकल्प वेळेत पूर्ण झाला असता तर आज येथील शेतकरी अधिक सुखी आणि समाधानी झाला असता, अशा जळजळीत शब्दांत आमदार अमोल खताळ यांनी प्रशासकीय दिरंगाईवर टीका केली.
गोदावरी, मराठवाडा व कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाच्या वतीने संगमनेर महाविद्यालयातील बाफना हॉल येथे आयोजित ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा २०२६’ च्या भव्य शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी आमदार खताळ यांनी जलव्यवस्थापनाचा हा पंधरवडा केवळ कागदावर किंवा औपचारिक न ठेवता तो प्रत्यक्ष जमिनीवर प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन केले. जलव्यवस्थापन यशस्वी करण्याची जबाबदारी केवळ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नसून, यात शेतकरी आणि कार्यकर्त्यांनीही सक्रिय सहभाग नोंदवणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
माजी खासदार स्व. बाळासाहेब विखे पाटील यांनी सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून समुद्राला वाहून जाणारे पाणी नदीजोड प्रकल्पाद्वारे गोदावरी खोऱ्यात वळविण्याचे स्वप्न पाहिले होते. हे स्वप्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील नक्कीच पूर्ण करतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. समुद्राला वाहून जाणारे अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवल्यास या भागाचा कायापालट होईल, असेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमात सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता उत्तम निर्मळ यांनीही आपले विचार मांडले. वाढते तापमान आणि पावसातील अनिश्चित खंड लक्षात घेता शेतकऱ्यांनी पिकांची निवड विचारपूर्वक करावी आणि पाणी वापर संस्थांच्या माध्यमातून आपला हक्क प्रस्थापित करावा, असा सल्ला त्यांनी दिला.
याप्रसंगी कार्यकारी अभियंता अमोल कवडे, प्रीतम शेवाळे, रामभाऊ राहाणे, श्रीकांत गोमासे, पायल ताजने, हरिभाऊ चकोर यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल कवडे यांनी केले, तर आभार महेश गायकवाड यांनी मानले.


