संगमनेर:
केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत. या सर्व योजनांवर सर्वसामान्य जनतेचा हक्क आहे त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी कोणालाही पैसे देण्याची गरज नाही. कोणत्याही एजंटच्या माध्यमातून काम करू नका. कुणी तुमच्याकडे पैसे मागत असेल थेट संपर्क साधा, संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा आमदार अमोल खताळ यांनी दिला.
शहरातील मातोश्री लॉंन्स येथे बांधकाम कामगारांना आमदार खताळ यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले. त्यावेळी बांधकाम कामगारांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजपचे ज्येष्ठ नेते भीमराज चत्तर, शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी, भाजप तालुकाध्यक्ष गुलाब भोसले, अहिल्यानगर येथील सहाय्यक कामगार आयुक्त रेवनाथ भिसले, कामगार अधिकारी स्वप्निल जाधव, दुकाने निरीक्षक ललित दाभाडे, भाजप राज्यकार्यकारणी सदस्य दादासाहेब गुंजाळ, भाजप उपाध्यक्ष राहुल दिघे, शिवसेना उपतालुका प्रमुख बादशाह गुंजाळ, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष रऊफ शेख, जेष्ठ नेते बाळासाहेब खेमनर, अशोक कानवडे, डॉ. महेंद्र कोल्हे, डॉ. सोमनाथ कानवडे, सुशील शेवाळे, सार्थक शेवाळे आदी उपस्थित होते.
आमदार खताळ म्हणाले, सध्याचे सरकार कामगार, महिला, शेतकरी आणि तरुणांचे सरकार असून प्रत्येक घटकाच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे तसेच राष्ट्रवादीच्या अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील महायुती सरकार काम करत आहे.
तालुक्यात नोंदणीकृत बांधकाम कामगारांची संख्या २४ हजार १२६ असून विविध योजनांद्वारे हजारो कामगारांना लाभ मिळाला आहे. शिष्यवृत्ती योजनेतून ६ हजार ८७७ लाभार्थ्यांना सुमारे ७ कोटी ६० लाख रुपयांची मदत वितरित केली आहे. तसेच सुरक्षा संच, अत्यावश्यक वस्तू संच आणि इतर योजनांचाही लाभ मिळाला असल्याचेही शेवटी आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.
यावेळी बांधकाम कामगारांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती सहाय्यक बांधकाम कामगार आयुक्त रेवनाथ भिसले यांनी दिली. स्वप्निल जाधव आणि दुकाने निरीक्षक ललित दाभाडे यांनी योजनांचे सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी मोठ्या संख्येने बांधकाम कामगार उपस्थित होते.


