Fri. May 29th, 2026

*”धनशक्तीने जनशक्तीला हरवलं!” : राहुरीचा रणसंग्राम आता हायकोर्टाच्या कोर्टात, मोकाटेंचा EVM वर ‘सातशे-आठशेचा’ संशय* 

 

* निवडणूक संपली तरी वाद संपत नाहीत, हे अहिल्यानगर जिल्ह्याने पुन्हा एकदा दाखवून दिलंय. लोकसभा निवडणुकीची याचिका नुकतीच हायकोर्टाने फेटाळली असतानाच, आता राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा धुरळा थेट न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पराभूत उमेदवार गोविंद मोकाटे यांनी थेट EVM वरच संशय व्यक्त केलाय. भाजपचे अक्षय कर्डिले यांनी 1 लाख 12 हजारांच्या मोठ्या फरकाने मोकाटेंचा पराभव केला. पण हा पराभव मोकाटेंना पचनी पडलेला नाही.

 

*मोकाटेंचे तीन स्फोटक आरोप:*

 

– *EVM चा ‘सातशे-आठशेचा’ पॅटर्न:* “पहिल्या फेरीपासून प्रत्येक फेरीत मला फक्त सातशे ते आठशे मतंच कशी मिळत गेली? हा आकडा संशयास्पद आहे,” असा थेट सवाल मोकाटेंनी उपस्थित केला आहे. याविरोधात ते उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत.

– *’धनशक्ती विरुद्ध जनशक्ती’ लढाई:* भाजपने मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी पैशाचा महापूर आणला, असा गंभीर आरोप मोकाटेंनी केला. “आम्ही एकही रुपया वाटला नाही. पैसे न वाटता किती मतं मिळतात, हा आमचा प्रयोग होता,” असे ते म्हणाले.

– *’घरका भेदी’ तनपुरे?:* पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांची भूमिकाच शेवटपर्यंत कळली नाही. “त्यांनी आम्हाला मदत केली नाही, हे स्पष्ट दिसतं,” असा घरचा आहेरही मोकाटेंनी दिला.

 

विश्वासाने उमेदवारी दिल्याबद्दल पक्षाचे आभार मानताना मोकाटेंनी पुढची लढाई न्यायालयीन असेल, हे स्पष्ट केलंय.

 

अहिल्यानगर जिल्ह्यात निवडणूक झाल्यावर निकालापेक्षा कोर्टाच्या पायऱ्या जास्त झिजवल्या जातात, हा पॅटर्न पुन्हा एकदा समोर आलाय. आता हायकोर्ट EVM च्या ‘सातशे-आठशेच्या’ कोड्यावर काय उत्तर देतं, याकडे सगळ्या जिल्ह्याचं लक्ष लागलंय.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!