संगमनेर:
वारकरी संप्रदाय आणि संतपरंपरेवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणाऱ्या विकास लवांडे यांच्यासारख्या प्रवृत्तींना योग्य उत्तर देण्याचे काम ह.भ.प. संग्राम बापू भंडारे महाराजांनी केले असून, आमदार अमोल खताळ यांनी या कृतीचे जाहीर समर्थन केले आहे.
वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, संतपरंपरेचा आणि हिंदू अस्मितेचा आत्मा असून या परंपरेवर सातत्याने होणारी चिखलफेक आता सहन केली जाणार नाही, असा इशारा आमदार खताळ यांनी आपल्या समाज माध्यमातील अकाउंट वरून दिला आहे.
https://www.facebook.com/share/1EQKpg8Mj3/
आमदार खताळ पुढे म्हणाले की, वारकरी संप्रदाय आणि गुरुतुल्य व्यक्तींवर वारंवार अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्यांविरोधात भंडारेंनी घेतलेली आक्रमक भूमिका ही लाखो वारकऱ्यांच्या भावनांचेच प्रतिबिंब आहे. “वारकरी संप्रदायाशी वाकड… त्याची नदीवर लाकड!” हे शब्द आज जनतेच्या मनातील चीड व्यक्त करत आहेत. देव, देश, धर्म आणि भगव्या पताकेचा अपमान करणाऱ्यांना संविधानिक आणि लोकशाही मार्गाने ठोस उत्तर दिले जाईल, असेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे.
संतपरंपरेच्या रक्षणासाठी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल आमदार अमोल खताळ यांनी ह.भ.प. संग्राम बापू भंडारे महाराजांचे मनापासून अभिनंदन केले असून त्यांना आपला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे.

