Fri. May 29th, 2026

​अकोले | प्रतिनिधी
समाजाचा आरसा आणि विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक मानले जाणारे शिक्षकच जर बेजबाबदारपणाचा कळस गाठू लागले, तर भविष्यातील पिढीवर काय संस्कार होतील, असा गंभीर प्रश्न अकोले तालुक्यात निर्माण झाला आहे. तालुक्यातील गुरवझाप पीरसाईनगर परिसरात एका शिक्षकाने मद्यधुंद अवस्थेत आपल्या अवघ्या १० ते ११ वर्षांच्या मुलाच्या हाती भरधाव कारचे स्टेअरिंग सोपवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, रविवार ३ मे २०२६ रोजी रामदास भांगरे नावाचे शिक्षक कथितरीत्या मद्यधुंद अवस्थेत असताना त्यांची ‘स्विफ्ट’ कार (क्रमांक MH 02 BJ 9347) घेऊन प्रवास करत होते. मात्र, स्वतः चालक असताना त्यांनी ही कार स्वतः न चालवता आपल्या अल्पवयीन मुलाला चालवण्यास दिली. हा मुलगा नवलेवाडी फाटा ते पथिक पेट्रोल पंप या वर्दळीच्या रस्त्यावर अत्यंत बेदरकारपणे आणि भरधाव वेगाने वाहन चालवत होता. रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनांना धोकादायक पद्धतीने कट मारत हा चिमुरडा कार पळवत असल्याचे पाहून उपस्थित नागरिक अवाक झाले.
रस्त्यावरील इतर नागरिकांचा जीव धोक्यात येत असल्याचे पाहून निखिल रावसाहेब चौधरी व इतर तरुणांनी पथिक पेट्रोल पंप परिसरात ही कार थांबवली. संबंधित शिक्षकाला त्यांच्या कृत्याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला असता, त्या शिक्षकाने पश्चाताप व्यक्त करण्याऐवजी उलट उद्धटपणे उत्तरे देत मगरुरीची वागणूक दिली. विद्यार्थ्यांना शिस्त शिकवणाऱ्या शिक्षकाची ही भाषा आणि वर्तन असू शकते का? असा सवाल आता नागरिक विचारत आहेत. या संपूर्ण वादाचे आणि मुलाच्या ड्रायव्हिंगचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले असून ते पुराव्यादाखल सादर करण्यात आले आहे.
​या प्रकरणी निखिल चौधरी यांनी अकोले पंचायत समितीच्या महिला व बालकल्याण विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली असून कठोर कारवाईची मागणी केली आहे. संबंधित शिक्षकावर भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम १२५ (जीवितास धोका निर्माण करणे) आणि कलम ३५१(२) (धमकावणे) सह बाल न्याय अधिनियम २०१५ च्या कलम ७५ अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच मोटार वाहन कायद्यानुसार अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन दिल्याबद्दल शिक्षकाचा परवाना रद्द करण्याचीही मागणी होत आहे.
​ही घटना ताजी असतानाच, या प्रकरणाचा जाब विचारल्याबद्दल बाळू खाडे नावाच्या एका अन्य शिक्षकाने तक्रारदाराला फोन करून रात्री उशिरा दमदाटी केल्याचा गंभीर आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. यामुळे हे प्रकरण केवळ एका शिक्षकाच्या बेजबाबदारपणापुरते मर्यादित न राहता, त्याला आता गुन्हेगारी स्वरूप प्राप्त होताना दिसत आहे.
​शिक्षण विभागाने संबंधित शिक्षकावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या या ‘मद्यधुंद’ शिक्षकाला प्रशासन पाठीशी घालणार की कठोर धडा शिकवणार, याकडे आता संपूर्ण अकोले तालुक्याचे लक्ष लागले आहे. संबंधितांवर तातडीने कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!