संगमनेर:
संगमनेर तालुक्यात बुधवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले असून लोहारे आणि डिग्रस येथे दोन वेगवेगळ्या घटनांत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लोहारे येथे अंगावर वीज पडल्याने लताबाई कैलास सोनवणे (वय ४२) यांना प्राण गमवावे लागले, तर डिग्रस येथे घराची भिंत कोसळून महादू माळी (वय ७०) या वृद्धाचा मृत्यू झाला. या घटनांची माहिती मिळताच आमदार अमोल खताळ यांनी प्रशासनाशी संपर्क साधून संबंधित कुटुंबांना तातडीने शासकीय मदत मिळवून देण्याच्या सूचना केल्या आहेत.
नैसर्गिक आपत्तीत प्राण गमावलेल्या दोन्ही कुटुंबांना शासनाकडून प्रत्येकी ४ लाख रुपयांची आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले. तालुक्यात अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला असून शेतीपिकांचे व मालमत्तेचेही प्रचंड नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांच्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिले आहेत. महायुतीचे सरकार शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून बाधितांना लवकरात लवकर दिलासा मिळावा यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
