Fri. May 29th, 2026

संगमनेर:
साकुर पठार भागातील विविध रस्ते कामांसाठी मंजूर झालेला सुमारे १७ कोटी रुपयांचा निधी माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्याच कार्यकाळातील असून, नवीन लोकप्रतिनिधींनी आयत्या पिठावर रेघोट्या मारून याचे श्रेय लाटू नये, अशी घणाघाती टीका जिल्हा परिषदेच्या माजी सभापती मीराताई शेटे यांनी केली आहे.

बिरेवाडी येथे पालकमंत्री आणि नवीन लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडलेल्या रस्ते कामांच्या भूमीपूजनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
​मीराताई शेटे यांनी स्पष्ट केले की, साकुर ते बिरेवाडी, रणखांबवाडी ते दिग्रस आणि तासकरवाडी ते खंडेरायवाडी या रस्त्यांसाठीचा निधी ऑक्टोबर २०२४ पूर्वीच मंजूर झालेला आहे. डिग्रस ते रणखांबवाडी हे काम थोरातांच्या २५-१५ निधीअंतर्गत मंजूर झाले होते, तर इतर रस्त्यांसाठी आपण स्वतः यशोधन कार्यालय आणि इंद्रजीत थोरात यांच्या मदतीने मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करून हा निधी आणला होता; याचे सर्व पुरावे आपल्याकडे उपलब्ध आहेत.
​नवीन लोकप्रतिनिधींनी गेल्या दीड वर्षांत तालुक्यासाठी कोणताही नवीन निधी आणलेला नाही, उलट थोरातांच्या काळातील विकासकामे रद्द करण्याचे काम त्यांनी केले आहे. स्वतः नवीन कामे उभी करता येत नसल्याने केवळ प्रसिद्धी मिळवणे आणि फ्लेक्स लावण्यातच हे लोक मग्न आहेत.

तालुक्यावर बाह्य शक्तींचे आक्रमण सुरू असून, विकासकामात शून्य योगदान असणाऱ्या लोकांना सोबत घेऊन भूमिपूजनाचे स्टंट केले जात आहेत. नवीन सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या हिमतीवर नवीन निधी आणून खुशाल उद्घाटने करावीत, मात्र जुन्या कामांचे श्रेय लाटणे बंद करावे, असा इशाराही शेटे यांनी याप्रसंगी दिला.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!