Fri. May 29th, 2026

संगमनेर:

तालुक्यातील तिगाव येथे शुक्रवारी (दि. २२) संध्याकाळी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. एका दगडाच्या खाणीत साचलेल्या पाण्याचा आणि खोलीचा अंदाज न आल्यामुळे दोन सख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

या दुर्दैवी घटनेत महेश गोरक्षनाथ सानप (वय १८) आणि ओंकार गोरक्षनाथ सानप (वय १४) या दोन तरुण भावांना आपले प्राण गमवावे लागले असून, यामुळे सानप कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

उन्हाळ्याच्या दिवसांमुळे दोघे भाऊ नेहमीप्रमाणे गावातील एका मोठ्या दगडाच्या खाणीत पोहण्यासाठी गेले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडू लागले आणि एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात दोघांचाही अंत झाला.

घटनेची माहिती मिळताच तिगावचे सरपंच ज्ञानेश्वर सानप यांनी ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही भावांना तातडीने पाण्यातून बाहेर काढले व उपचारासाठी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीपूर्वीच दोघांना मृत घोषित केले. एकाच वेळी दोन मुलांचा मृत्यू झाल्याने रुग्णालयाच्या परिसरात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.

या घटनेप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण तिगाव परिसरावर शोककळा पसरली असून, पालकांनी आपल्या मुलांना अशा धोकादायक पाण्याच्या ठिकाणी जाण्यापासून रोखावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!