संगमनेर:
बदलाच्या उंबरठ्यावर असलेल्या युवा पिढीला योग्य दिशा मिळावी आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा या उद्देशाने राष्ट्र सेवा दलाच्यावतीने १६ ते २५ वयोगटातील तरुण-तरुणींसाठी २९ मे पासून एका विशेष ‘युवा व्यक्तिमत्व विकास उन्हाळी शिबिरा’चे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिराबाबतची सविस्तर माहिती राष्ट्र सेवा दलाचे राज्य कार्यकारिणी सदस्य दत्ता ढगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. हे विशेष उन्हाळी शिबिर दिनांक २९ मे ते ०१ जून २०२६ या कालावधीत संगमनेर जवळील खांडगाव येथील खांडेश्वर सांस्कृतिक भवन येथे पार पडणार आहे. १६ ते २५ वर्षे हा वयोगट वैचारिकदृष्ट्या अत्यंत क्रियाशील असतो आणि याच काळात त्यांच्यात नवनिर्माणाची क्षमता असते.
त्यामुळे या वयातील मुला-मुलींमध्ये उपजत असलेले नेतृत्व गुण, कला, क्रीडा कौशल्ये आणि संवाद कौशल्य विकसित करणे, तसेच त्यांच्यात सामाजिक जाणिवा निर्माण करून एक सुजाण नागरिक घडवणे हा या शिबिरामागील मुख्य हेतू आहे.
सध्याच्या डिजिटल युगात मोबाईल आणि इतर समाजमाध्यमांच्या अतिवापरामुळे तरुण पिढीचा कुटुंबातील संवाद आणि सहभाग मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे. यामुळे तरुणांमध्ये एक प्रकारचा वैचारिक गोंधळ निर्माण होत असून, अनेकदा हा वयोगट चुकीच्या मार्गाकडे आकर्षित होताना दिसत आहे.
या पार्श्वभूमीवर तरुणांना वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर सजग करणे अत्यंत गरजेचे बनले आहे. हे शिबिर तरुणांमध्ये सर्वांगीण प्रगल्भता निर्माण करण्यासाठी आणि त्यांचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
या महत्त्वपूर्ण शिबिराचा लाभ घेण्यासाठी आणि अधिक माहितीसह आपले नाव नोंदवण्यासाठी राष्ट्र सेवा दलाचे राज्य मंडळ सदस्य रजत अवसक (९४०५२७२२२३) आणि संजयकुमार शिंदे (९८५०१७९२०५) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तालुक्यातील पालकांनी आपल्या पाल्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी त्यांना या उन्हाळी शिबिरात मोठ्या संख्येने दाखल करावे, असे आवाहन दत्ता ढगे आणि राष्ट्र सेवा दलाच्या वतीने करण्यात आले आहे.


