Fri. May 29th, 2026

श्रीरामपूर:

लोणी (अहिल्यानगर) येथील बेकायदेशीर लिंगनिदान आणि अवैध गर्भपात रॅकेटप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत नाशिकच्या निफाड भागातून एका डॉक्टरसह दोघांना अटक केली आहे. या धडक कारवाईमुळे या संपूर्ण प्रकरणातील एकूण अटक आरोपींची संख्या आता १८ वर पोहोचली असून, यामध्ये ६ नामांकित डॉक्टरांचा समावेश असल्याने वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश करत आतापर्यंत एकूण ४ पोर्टेबल सोनोग्राफी मशीन आणि ३ चारचाकी वाहने जप्त केली आहेत.

पुण्यातून अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीतून या रॅकेटचे धागेदोरे नाशिकपर्यंत पोहोचले. त्यानुसार पोलिसांनी निफाड येथील डॉ. कुणाल प्रभाकर वल्टे आणि सागर शांताराम उल्हाळ यांना ताब्यात घेतले.

डॉ. वल्टे याने पुणे येथील ठाकरे नामक व्यक्तीकडून बेकायदेशीर सोनोग्राफी मशीन विकत घेतले होते, तर सागर उल्हाळ याने ते मशीन आपल्या लॅबमध्ये लपवून ठेवण्यास मदत केली होती. न्यायालयाने या दोन्ही आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या गुन्ह्याची व्याप्ती अहिल्यानगर, पुणे आणि नाशिक अशा विविध जिल्ह्यांत पसरली असून, सुरुवातीला नेवासा, श्रीरामपूर आणि पुणे येथून डॉक्टर, एजंट आणि खरेदीदारांना अटक करण्यात आली होती.

जिल्हा पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन आणि अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या प्रकरणाचा अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने सखोल तपास करत आहेत. या रॅकेटमध्ये आगामी काळात आणखी काही मोठ्या डॉक्टरांची नावे समोर येण्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!