संगमनेर: जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठे परिवर्तन होणार असल्याचे स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीप्रमाणेच भाजपमध्ये जिल्ह्यातून अनेकजण प्रवेश करण्यास इच्छुक असून, पक्षाची क्षमता वाढवणाऱ्या लोकांना सोबत घेण्याचे धोरण आहे. महायुतीच्या दिपावली स्नेहमिलन कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांच्या भेटीवर बोलताना विखे पाटील म्हणाले की, श्रीमती सुनिता भांगरे आणि अमित भांगरे यांनी भेट घेतली. यावेळी माजी आमदार वैभव पिचड उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी जिल्ह्यात ‘ऑपरेशन लोटस’ निश्चित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, संगमनेर तालुक्यातूनही अनेकजण पक्षात येण्यास इच्छुक असल्याचे सूचक विधान त्यांनी केले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नव्या-जुन्या कार्यकर्त्यांवरील वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना विखे पाटील यांनी त्यांच्या मताशी असहमत असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, नव्या-जुन्या कार्यकर्त्यांचा समन्वय साधूनच पक्ष पुढे गेला आहे आणि महायुतीचे सरकारही या समन्वयानेच येऊ शकले.
इतर मुद्द्यांवर बोलताना त्यांनी फलटण येथील घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले असून, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा असे मत व्यक्त केले. नेवासा येथील घटनेबाबत आरोपी कोणीही असो कारवाई होणार, तसेच संघ कार्यकर्त्यांशी संबंध जोडून कोणी बचाव करण्याचा प्रयत्न केल्यास तो शक्य होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. पोलीस लवकरच या घटनेचा अहवाल सादर करतील.