अकोले:
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील जनतेने ज्या अपेक्षेने आणि विश्वासाने खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना निवडून दिले, त्या अपेक्षांची पूर्तता करण्यात ते पूर्णपणे अपयशी ठरल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते यांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालाला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी एक व्हिडिओ संदेश जारी करत खासदारांच्या कामगिरीवर धारदार शब्दांत टीका केली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान वाकचौरे यांनी जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने आणि प्रत्यक्षातील कामे यांचा लेखाजोखा त्यांनी जनतेसमोर मांडायला हवा होता, परंतु लोकप्रतिनिधी म्हणून ते आपले कर्तव्य बजावण्यात अपयशी ठरले आहेत, असे रूपवते म्हणाल्या.
इतर विरोधी खासदारांप्रमाणे वाकचौरे यांनी संसदेत भाजप आणि आरएसएसच्या विचारसरणीच्या विरोधात किंवा महिला व दलितांच्या प्रश्नांवर कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
‘ऑपरेशन टायगर’ सारख्या राजकीय घडामोडींमध्ये त्यांचे नाव सातत्याने पुढे येत असले, तरी शिर्डी लोकसभेचा एकही प्रलंबित किंवा महत्त्वाचा प्रश्न त्यांनी संसदेत आक्रमकपणे मांडला नाही, ही मतदारसंघासाठी मोठी शोकांतिका आहे.
खासदारांचा अजून तीन वर्षांचा कार्यकाळ बाकी असून, त्यांनी राजकीय उलथापालथींमध्ये न गुंतता जनतेच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करावे, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले आहे.
