संगमनेर | प्रतिनिधी
सामान्यतः लोकप्रतिनिधी विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटने किंवा शासकीय बैठकांमध्ये व्यस्त असलेले पाहायला मिळतात. मात्र, संगमनेरचे शिवसेना महायुतीचे आमदार अमोल खताळ यांनी नुकतीच एक वेगळी भूमिका पार पाडत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी थेट एसटी बसचे स्टेअरिंग हातात घेत काही अंतर स्वतः बस चालवली आणि त्याच बसमधून कार्यकर्त्यांसह प्रवास केला. संगमनेर बसस्थानकातून सुरू झालेली ही विशेष सफर नाशिक रोड मार्गे निमोण नाका येथे पोहोचली आणि तेथून पुन्हा बसस्थानकात परतली. या अनपेक्षित उपक्रमामुळे बसस्थानक परिसरातील प्रवासी, एसटी अधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये कमालीचे उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले होते.
संगमनेर आगाराच्या ताफ्यामध्ये राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून पाच नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल झाल्या आहेत. या आधुनिक बसेस मिळविण्यामागे आमदार अमोल खताळ यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा अत्यंत महत्त्वाचा ठरला. काही दिवसांपूर्वीच त्यांनी मुंबई येथे परिवहन मंत्र्यांची भेट घेऊन संगमनेर आगारासाठी मंजूर बसेस तातडीने उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी केली होती. या मागणीची त्वरित दखल घेत परिवहन मंत्री सरनाईक यांनी पाच नवीन बसेस मंजूर केल्या, ज्या रात्रीच संगमनेरमध्ये दाखल झाल्या. या सर्व बसेसचा अधिकृत लोकार्पण सोहळा आमदार खताळ यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.
लोकार्पण सोहळा संपन्न झाल्यानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आमदार खताळ यांना बस चालविण्याचा आगळावेगळा आग्रह धरला. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव त्यांनी तात्काळ चालकाच्या आसनावर विराजमान होत ‘राजमाता जिजाऊ’ बसचे स्टेअरिंग हातात घेतले आणि बस मार्गस्थ केली. आमदार स्वतः बस चालवत असल्याचे पाहताच स्थानकातील प्रवाशांमध्ये आणि नागरिकांमध्ये एकच कुतूहल निर्माण झाले. बसस्थानक परिसरात जमा झालेल्या नागरिकांनी हा अनोखा आणि ऐतिहासिक क्षण आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये टिपण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
निमोण नाका पर्यंतच्या या प्रवासादरम्यान आमदार खताळ यांनी केवळ ड्रायव्हिंगच केले नाही, तर बसमधील आसनव्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, प्रवाशांसाठीच्या इतर सुविधा आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांची बारकाईने पाहणी केली. या विशेष आणि आनंददायी प्रवासात संगमनेर आगाराचे आगार व्यवस्थापक प्रशांत गुंड यांच्यासह शिवसेना-महायुतीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संगमनेरकरांनीही या नव्या बसेसचे स्वागत केले असून, यामुळे ग्रामीण भागातील प्रवास अधिक सोयीस्कर आणि आरामदायी होईल, अशी आशा व्यक्त केली आहे.
एसटी ही ग्रामीण भागातील जनतेची जीवनवाहिनी आहे!
ग्रामीण भागातील जनतेसाठी एसटी ही केवळ वाहतुकीची सेवा नसून खरी जीवनवाहिनी आहे. विद्यार्थी, शेतकरी, कामगार, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांचा दैनंदिन प्रवास पूर्णपणे एसटीवर अवलंबून असतो. त्यामुळे प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार सेवा मिळणे अत्यंत आवश्यक आहे. संगमनेर आगाराच्या ताफ्यात या पाच नव्या बसेस दाखल झाल्याने प्रवाशांच्या सेवेची गुणवत्ता आणखी उंचावण्यास मोठी मदत होणार आहे. — अमोल खताळ, आमदार
