Fri. Jun 19th, 2026

संगमनेर:

पक्षनिष्ठेशी वारंवार प्रतारणा करणाऱ्या आणि शिर्डीच्या मतदारांच्या पाठीत पुन्हा एकदा गद्दारीचा खंजीर खुपसणाऱ्या खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विरोधात बुधवारी संगमनेर येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने ‘जोडे मारो’ आंदोलन करत प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. ‘गद्दार’ वाकचौरेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला साडी नेसवून, शिवसैनिकांनी घोषणांच्या कडकडाटात त्याचे दहन केले आणि गद्दारांना त्यांची जागा दाखवून दिली.

माफीचा मुखवटा गळून पडला!

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या दिलदारपणामुळे आणि शिवसैनिकांच्या रक्ताच्या पाण्याचे चीज करत खासदार म्हणून निवडून आलेल्या वाकचौरेंनी पुन्हा एकदा आपली ‘निष्ठा’ मिंधे गटाच्या चरणी गहाण ठेवली. यापूर्वीही गद्दारी करून पश्चात्तापाचे ढोंग रचणाऱ्या वाकचौरेंनी मातोश्रीवर येऊन माफी मागितली होती. “आयुष्यभर शिवसेनेतच राहीन,” अशी खोटी शपथ घेणाऱ्या या सरड्याला उद्धवजींनी उमेदवारी दिली, शिवसैनिकांनी डोक्यावर घेतले आणि निवडून आणले. मात्र, दिल्लीची खुर्ची मिळताच या कृतघ्नाने पुन्हा रंग बदलले.

संगमनेर शिवसैनिकांचा ‘रुद्रअवतार’

शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमर कतारी आणि शहरप्रमुख अमित चव्हाण यांच्या धडाकेबाज नेतृत्वाखाली सायंकाळी साडेचार वाजता शिवसैनिक आणि महिला आघाडीने संगमनेरचा परिसर घोषणांनी दणाणून सोडला. “पन्नास खोके, एकदम ओक्के…” आणि “गद्दारांचे करायचे काय, खाली डोके वर पाय…” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

शिवसेनेचा थेट इशारा

पक्षनिष्ठेशी तडजोड करणाऱ्या आणि मतदारांचा विश्वासघात करणाऱ्या अशा लाचार गद्दारांना मतदारसंघात फिरू देणार नाही. ही तर फक्त सुरुवात आहे, भविष्यात यापेक्षाही तीव्र आणि ‘शिवसेना स्टाईल’ हिसका दाखवला जाईल!

या धगधगत्या आंदोलनात शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमर कतारी, शहरप्रमुख अमित चव्हाण व फैसल सय्यद, व्यापारी आघाडीचे संभव लोढा, तालुकाप्रमुख भीमाशंकर पावसे, विधानसभा प्रमुख अमोल डुकरे यांच्यासह अशोक बढे, अरुण भालेराव, रवी गिरी, बाळासाहेब घोडके, आसिफ तांबोळी, दीपक साळुंके, राजाभाऊ सातपुते, प्रकाश गायकवाड, सदाशिव हासे, गणेश धात्रक, राजश्रीताई राहणे, त्रिलोक कतारी, आदित्य गायकवाड, प्रशांत खजूरे, कैलास गायके आणि त्रिंबक शिंदे यांसह अनेक प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रणरागिणी मोठ्या संख्येने मैदानावर उतरले होते.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!