संगमनेर: संगमनेर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या मतदार याद्या सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. १५ प्रभागांतील मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याबाबत तब्बल १७३० हरकती दाखल झाल्या असून, यावर मंगळवारी (दि. २८) प्रांताधिकारी कार्यालयात निर्णायक सुनावणी होणार आहे.
अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर प्रसिद्ध झालेल्या मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे चुकीने दुसऱ्या प्रभागात गेल्याचे उघड झाले. यामुळे स्वतः मतदारांनी तसेच इच्छुक नगरसेवक, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हरकती नोंदवल्या.

प्रभारी मुख्याधिकारी धनश्री पवार यांच्या माहितीनुसार, एकूण १७३० हरकती ‘अ’ आणि ‘ब’ अशा दोन वर्गांत आहेत. ‘अ’ वर्गात मतदारांनी स्वतः नाव चुकीच्या प्रभागात गेल्याबद्दल आक्षेप घेतला आहे, तर ‘ब’ वर्गात इच्छुक नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी इतर मतदारांच्या नावांवर हरकती घेतल्या आहेत, ज्यामुळे काही मतदारांमध्ये नाराजी आहे.
प्रांताधिकारी कार्यालयाकडे दाखल झालेल्या एकूण १७३० हरकतींपैकी ‘अ’ वर्गातील २०० हरकतींसह इतरही काही हरकती यापूर्वीच निकाली काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता सुमारे एक हजार हरकतींवरच मंगळवारी (दि. २८) प्रांताधिकारी अरुण उंडे यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.
सुनावणीदरम्यान मतदार, त्यांचे प्रतिनिधी आणि हरकत घेणारे आपले म्हणणे मांडतील. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर केला आहे. मतदार कोणत्या प्रभागात नाव समाविष्ट करू इच्छितो, यावर प्रांताधिकारी अंतिम निर्णय देतील. या सुनावणीनंतर लगेचच मतदार यादी अंतिम करून प्रसिद्ध केली जाणार आहे.