Fri. May 29th, 2026

संगमनेर: एकेकाळी ‘सुरक्षित, सुसंस्कृत आणि वैभवशाली’ अशी ओळख असलेल्या संगमनेर शहरात सध्या प्रशासकीय पातळीवर वाढलेल्या समस्यांमुळे नागरिकांचा संयम संपला आहे. अस्वच्छता, अनियमित पाणी-वीज पुरवठा, अवैध फ्लेक्सबाजी आणि मोकाट जनावरांच्या त्रासाला नागरिक अक्षरशः कंटाळले आहेत. या गंभीर समस्यांकडे नगर परिषदेचे होत असलेले दुर्लक्ष पाहून संगमनेरकरांनी आज सोमवारी नगर परिषदेवर भव्य मोर्चा काढून ‘हल्लाबोल’ केला. येत्या आठ दिवसांत या समस्यांवर प्रभावी उपाययोजना न झाल्यास शहरवासीय भव्य ‘चक्का जाम’ आंदोलन करतील, असा आक्रमक इशारा आंदोलकांनी पालिका प्रशासनाला दिला आहे.

निवेदनात नागरिकांनी अनेक गंभीर समस्यांकडे लक्ष वेधले. यामध्ये लोकनेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून निळवंडे धरणातून थेट पाईपलाईन कार्यान्वित झाली असली तरी शहरात सध्या अपूर्ण दाबाने पाणीपुरवठा होत आहे, तो त्वरित सुरळीत करण्याची मागणी आहे. तसेच, ‘स्वच्छ संगमनेर, सुंदर संगमनेर’ ही ओळख पुसली जात असून शहरात मोठी अस्वच्छता वाढली आहे. अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून, कचरा वेळेवर उचलला जात नाही, यामुळे डास व आजारांचे प्रमाण वाढले आहे.

याव्यतिरिक्त, स्ट्रीट लाईट वेळेवर सुरू होत नाहीत, तसेच विजेच्या तारांवर झाडांच्या फांद्या लोंबकळल्याने धोका वाढला आहे. शहरात मोकाट गाई, कुत्रे, डुकरे यांचा मोठा उपद्रव वाढला असून, त्यांच्या बंदोबस्ताची तातडीने मागणी करण्यात आली आहे. सार्वजनिक सुलभ शौचालय व युरिनलची नियमित स्वच्छता होत नाही आणि तिथे नळ जोडणी नाही, अशी दुरवस्था आहे. शहरातील अनेक रस्त्यांची खड्डेमय अवस्था झाली असून ते त्वरित बुजवावेत, तसेच साईड पट्ट्यांवरील माती उचलून रस्ते स्वच्छ ठेवावेत.

सोबतच, मागील सहा महिन्यांपासून शहरात अनाधिकृत राजकीय फ्लेक्स मोठ्या प्रमाणात लागलेले असल्याने शहराचे विद्रूपीकरण होत आहे, हे सर्व फ्लेक्स तातडीने काढले जावेत, अशी मागणीही आंदोलकांनी केली.

माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, सोमेश्वर दिवटे, गजेंद्र अभंग, शैलेश कलंत्री, डॉ. दानिश रईस खान, शुभम परदेशी, बादल जेधे, सिद्राम दिड्डी, निखिल पापडेजा, हैदरअली सय्यद, संदीप लोहे, बाजीराव शेरमाळे, नाना वाघ, सतीश आहेर, ॲड. प्रकाश कडलग, किरण पाटणकर, मंगला बाळसराफ, सलीम रंगरेज, वैशाली आडेप, अफजल शेख, अभय खोजे, नूर मोहम्मद शेख, अंबादास आडेप, सुभाष दिघे, एकनाथ श्रीपाद, सचिन खाडे, गोपी जहागीरदार, अलोक बर्डे, प्रमोद गणोरे, जावेद शेख, प्रवीण दीड्डी, बाळासाहेब पवार, निरंजन सातपुते, कमलेश सोनवणे, तुषार पवार, विशाल सस्कर, नदीम कुरेशी, मुजीब खान, बालम पठाण, मुन्ना शेख, प्रमिला अभंग, वैशाली बर्गे, सुरेश झावरे, संतोष सातपुते, सिकंदर शेख, संतोष मुर्तडक, तुकाराम शिरोळे, नितीन अभंग, ईश्वर फापाळे, सुनील सस्कर, गीता सस्कर, विजय पवार, सुनिता कांदळकर आदींसह प्रमुख नागरिकांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्याधिकारी धनश्री पवार यांना निवेदन दिले.

आंदोलनादरम्यान नागरिकांनी नगरपालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर मुख्याधिकारी धनश्री पवार व विविध विभाग प्रमुखांनी निवेदन स्वीकारत, सर्व समस्यांवर तात्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. मात्र, नागरिकांनी हे आश्वासन पुरेसे न मानता, येत्या आठ दिवसांत समस्या सुटल्या नाहीत, तर शहरातील नागरिक एकत्र येऊन भव्य ‘चक्का जाम’ आंदोलन करतील, असा आक्रमक इशारा दिला आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!