संगमनेर – लोककलावंतांना ‘शासनकृत कलावंत’ म्हणून तातडीने मान्यता मिळावी, त्यांच्यासाठी विशेष योजना लागू कराव्यात आणि सध्याच्या तुटपुंज्या मानधनात भरीव वाढ व्हावी, या प्रमुख मागण्यांसाठी लोककलावंत सांस्कृतिक विचार मंचाच्या नेतृत्वाखाली काल (गुरुवार, ३० ऑक्टोबर) लोककलावंतांनी संगमनेर प्रांताधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला.
लोककलावंतांच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. संघटनेने प्रांताधिकारी यांना सविस्तर निवेदन सादर केले, यात प्रामुख्याने मानधनात भरीव वाढ करण्याची मागणी केली आहे. तसेच, मानधनाव्यतिरिक्त कलेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध शासकीय योजना त्वरित राबविण्यात याव्यात आणि त्यांना अधिकृतपणे ‘शासनकृत कलावंत’ म्हणून मान्यता मिळावी, अशीही मागणी करण्यात आली.

यासोबतच, ‘राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजने’ संदर्भात महत्त्वपूर्ण मागणी करण्यात आली, ज्यात जिल्ह्यातून मंजूर होणाऱ्या प्रस्तावांची संख्या १०० वरून ५०० पर्यंत वाढवावी असे म्हटले आहे. याव्यतिरिक्त, शासनाने लोककलावंतांचा रु. १० लाखांचा मोफत विमा उतरावा, त्यांना एस.टी. (ST) आणि रेल्वेचा प्रवास मोफत उपलब्ध करून द्यावा, तसेच कलावंतांना ते ‘ग्रामीण कलावंत’ असल्याचा अधिकृत दाखला त्वरित देण्यात यावा, अशा महत्त्वपूर्ण मागण्या करण्यात आल्या.
यावेळी लोककलावंत सांस्कृतिक विचार मंचाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कलावंत उपस्थित होते.