संगमनेर – फलटण येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांच्या कथित आत्महत्या प्रकरणात दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करत ‘राहुल गांधी समर्थक संघ, महाराष्ट्र’ (RGSS) आक्रमक झाला आहे. संगमनेर शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना काल (मंगळवार, २८ ऑक्टोबर) RGSS च्या वतीने निवेदन देण्यात आले.
डॉ. मुंडे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने याच्यावर बलात्काराचा, तसेच प्रशांत बनकर व इतरांकडून शारीरिक-मानसिक छळाचा गंभीर आरोप केला आहे. पोलीस यंत्रणेतील अधिकाऱ्यावरच असे गंभीर आरोप होणे, ही कायदा व सुव्यस्थेच्या दृष्टीने चिंताजनक बाब असल्याचे RGSS ने स्पष्ट केले.

या प्रकरणातील आरोपींना संरक्षण देण्यासाठी माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर, त्यांचे स्वीय्य सहाय्यक राजेंद्र शिंदे, आणि रोहित नागतिळे यांनी दबाव टाकल्याचा गंभीर आरोप RGSS ने केला आहे. पीडित डॉ. मुंडे यांच्या कुटुंबानेही या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोप करत तातडीने न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
भविष्यात कोणत्याही महिला अधिकारी किंवा कर्मचाऱ्यावर अशी गंभीर परिस्थिती येऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनात त्वरित सुधारणा करण्याची मागणी RGSS ने केली आहे. अमोल शेलकर, राम अरगडे, प्रकाश कडलग, सतीश खताळ, मोहसीन शेख, कल्याण जोर्वेकर, अरुण गावित्रे, अक्षय मोहिते, शंतनू भालेकर, अनिल राऊत, भरत कळसकर आदी कार्यकर्त्यांनी हे निवेदन दिले.
सदर मागण्या अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत सातारा पोलीस आयुक्त यांच्यापर्यंत पोहोचवाव्यात, अशी विनंतीही संघाने केली आहे.