Fri. May 29th, 2026

महासंगम न्यूज ऑनलाईन – संगमनेर

संगमनेर विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांची सखोल पडताळणी (SIR) त्वरित करावी, या मागणीसाठी ‘राहुल गांधी समर्थक संघ’ आक्रमक झाला आहे. मतदार याद्यांमध्ये ‘घोळ’ असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर, संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी २८ ऑक्टोबर रोजी संगमनेरच्या तहसीलदारांना याबाबत लेखी निवेदन सादर करून तात्काळ कार्यवाहीची मागणी केली.

निवेदनात, निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी SIR मोहीम राबवणे अत्यंत आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

समान परिस्थितीत वेगवेगळे निकष का? – संघाचा निवडणूक आयोगाला सवाल

राहुल गांधी समर्थक संघाने आपल्या मागणीला बळ देण्यासाठी केरळ राज्याच्या सध्याच्या परिस्थितीचा दाखला दिला आहे. पुढच्या महिन्यात केरळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून, तेथे निवडणूक अधिसूचना अद्याप निघाली नसल्याने सध्या मतदार याद्यांची सखोल पडताळणी मोहीम (SIR) जोरात सुरू आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली आहे.

याच मुद्द्यावरून संघाने निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. ते म्हणतात की, केरळ आणि महाराष्ट्रातील निवडणूक वेळापत्रक समान असतानाही, या दोन्ही राज्यांसाठी वेगवेगळे निकष का लावले जात आहेत? जर निवडणूक अधिसूचना हाच SIR न राबवण्यास एकमेव अडथळा असेल, तर महाराष्ट्र आणि संगमनेरमध्ये ही प्रक्रिया राबवण्यासाठी कोणतीही हरकत नसावी.

संघाने, निवडणूक आयोगाने आपल्या हेतूचा खुलासा करून, देशातील जनतेचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास पुनश्च बहाल करावा, अशी भूमिका मांडली आहे.

तहसीलदारांमार्फत राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी – राहुल गांधी समर्थक संघाने तहसीलदारांना विनंती केली आहे की, त्यांनी या मागणीचा गंभीर विचार करून राज्य निवडणूक आयोगास योग्य तो पत्रव्यवहार करावा आणि ही मागणी त्यांच्यापर्यंत पोहोचवावी.

नायब तहसीलदारांनी हे निवेदन स्वीकारले असून, निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात राहुल गांधी समर्थक संघ, महाराष्ट्राचे पदाधिकारी अमोल शेलकर, राम अरगडे, प्रकाश कडलग, सतीश खताळ, मोहसीन शेख, कल्याण जोर्वेकर, अरुण गावित्रे, अक्षय मोहिते, शंतनू भालेकर, रवींद्र हासे, अनिल राऊत, भरत कळसकर आदींचा समावेश होता.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!