संगमनेर – गेल्या आठवड्यात (२४ ऑक्टोंबर) संगमनेर तालुक्यातील रायते येथील दळे कुटुंबावर मोठे संकट कोसळले होते. अज्ञात व्यक्तीने त्यांच्या दोन मोटारसायकल आणि शाळेत जाणाऱ्या मुलाची सायकल जाळून टाकली होती. या घटनेमुळे वाहनांचे मोठे नुकसान झालेच, पण विशेषत: सह्याद्री शाळेत शिकणाऱ्या मुलाची सायकल जळाल्याने त्याची शाळेत जाण्याची मोठी गैरसोय झाली होती.
घडलेल्या घटनेनंतर अनेक राजकीय नेत्यांनी कुटुंबाची भेट घेतली असली तरी कोणतीही ठोस मदत न मिळाल्याने कुटुंबाची निराशा वाढली होती. मात्र, दळे कुटुंबाच्या या संकटाची आणि विद्यार्थ्याच्या गैरसोयीची माहिती मिळताच राहुल गांधी समर्थक संघ (RGSS) संगमनेर यांच्या टीमने तातडीने मदतीसाठी पुढाकार घेतला.

बुधवारी (दिनांक २९ ऑक्टोंबर) सायंकाळी RGSS च्या टीमने दळे कुटुंबाला एक नवीन सायकल भेट म्हणून दिली. ही सायकल क्रॉस व्हील सायकलचे संचालक राहुल वर्पे यांनी ना नफा ना तोटा या तत्त्वावर RGSS ला उपलब्ध करून दिली.
RGSS च्या सदस्यांकडून मिळालेली ही अनपेक्षित मदत पाहून दळे कुटुंबाचे डोळे पाणावले. समाजात माणुसकी अजूनही जिवंत आहे, या भावनेने त्यांना मोठा दिलासा मिळाला. दळे परिवाराने RGSS च्या संपूर्ण ग्रुपचे मनापासून कौतुक करत आभार मानले.
RGSS संगमनेरचे हे सामाजिक कार्य यशस्वी करण्यासाठी अमोल शेलकर, शिवश्री राम अरगडे, प्रकाश कडलग, सतीश खताळ, मोहसीन रशीद शेख, सुभाष महाराज कोकणे, मोहसीन खलील शेख, अक्षय मोहिते, शंतनू भालेकर, रवींद्र हासे, अनिल राऊत, भरत कळसकर, अरुण गावित्रे आदींनी सहकार्य केले. RGSS ने केलेल्या या मानवतावादी कार्यामुळे दळे कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे आणि समाजासमोर एक चांगला आदर्श निर्माण झाला आहे.