Sat. May 30th, 2026

संगमनेर – संगमनेर शहरातील इंदिरानगर परिसर व परिसरालगतच्या काही भागांत गेल्या अनेक दिवसांपासून विजेच्या लपंडावामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. महावितरणच्या अधिकाऱ्यांचे या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा थेट आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख रवींद्र कानकाटे यांनी केला आहे.

वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, दिवसाआड लाईट जाणे, तसेच रात्रीच्या वेळी अचानक वीज गायब होणे, यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

कानकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदिरानगर भागातील लाईटच्या डीपीवर वारंवार लोड येऊन फ्युज उडणे आणि थेट जाळ निघणे अशा घटना नित्याच्याच झाल्या आहेत. महावितरणचे कर्मचारी येतात, तात्पुरती ‘लाली पावडर’ (डागडुजी) करून निघून जातात; पण दोन-तीन दिवसांतच तो त्रास पुन्हा सुरू होतो. या तात्पुरत्या उपाययोजनांमुळे नागरिक हैराण झाले आहेत.

या सर्वात गंभीर बाब म्हणजे, आता इंदिरानगरमधील काही गल्लींमध्ये डीम लाईट होण्याची समस्या वाढली आहे. या ‘डीम लाईट’मुळे सकाळी पाण्याची मोटर चालत नाही, परिणामी नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे व पाणीटंचाईच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नागरिकांच्या या वाढत्या त्रासावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी रवींद्र कानकाटे यांनी केली आहे.

इंदिरानगरमधील डीपीची लवकरात लवकर दुरुस्ती करून त्यामध्ये नवीन आणि अद्ययावत यंत्रणा वापरून वीजपुरवठा सुरळीत करावा. नागरिकांना या दैनंदिन त्रासातून तातडीने मुक्त करावे. या डीपीचे काम लवकरात लवकर पूर्ण झाले नाही, तर होणाऱ्या परिणामाला महावितरण पूर्णपणे जबाबदार राहील याची त्यांनी गंभीर नोंद घ्यावी. – रवींद्र कानकाटे, शिवसेना शहरप्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!