Sat. May 30th, 2026

महासंगम न्यूज ऑनलाईन

संगमनेर – संगमनेर ग्रामीण विभागात बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीती आणि संताप पसरला आहे. गेल्या चार महिन्यांत दोन निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत, तर अनेक पाळीव जनावरे बिबट्याचे बळी ठरले आहेत. या गंभीर परिस्थितीवर तात्काळ आणि ठोस उपाययोजना करण्याची मागणी करत, राहुल गांधी समर्थक संघ महाराष्ट्र (RGSS) या संघटनेने वन अधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

या हल्ल्यांच्या मालिकेत मेंढवण येथील हिराबाई एकनाथ बढे यांचा मृत्यू झाला. याव्यतिरिक्त, सावरगाव तळ येथील मेंढी तळावर सुशाबाई व भास्कर हरिभाऊ पांडे हे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाले, तर हिवरगाव पावसा येथील अर्चना संदीप टेमगिरे यांनाही बिबट्याने लक्ष्य केले. डिग्रस येथील शाळकरी मुलगी प्रगती शाळेत जाताना वाटेत बिबट्याच्या अचानक हल्ल्यात जखमी झाली होती. तसेच, बोटा येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात 2 शेळ्या ठार झाल्याने पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे.

या सातत्याने होत असलेल्या घटनांमुळे लहान मुले, महिला आणि वयोवृद्धांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. वन विभागाने काही बिबटे पकडले असले तरी, नागरिकांच्या म्हणण्यानुसार, नरभक्षक बिबटे अजूनही मोकाट असून सार्वजनिक सुरक्षिततेसाठी मोठा धोका निर्माण करत आहेत.

या जीवघेण्या समस्येवर त्वरित तोडगा काढण्यासाठी RGSS ने वन विभागाकडे नरभक्षक बिबट्याला गोळ्या घालून ठार करण्याची तातडीने परवानगी देण्यासह, बिबट नियंत्रणासाठी विशेष टास्क फोर्स तैनात करावी आणि यासाठी पुरेसा निधी, तंत्रज्ञान आणि तज्ञ मनुष्यबळ उपलब्ध करण्याची मागणी केली आहे. दीर्घकालीन उपाययोजनांसाठी बिबट्यांची लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रजनन नियंत्रण कार्यक्रमासाठी केंद्र शासनाकडे वेगाने पाठपुरावा करावा, तसेच पकडलेल्या बिबट्यांचा पुन्हा मानवी वस्तीत शिरकाव टाळण्यासाठी वन विभागाच्या हद्दीत 20 फूट उंचीचे भक्कम व सुरक्षित तार कंपाऊंड उभे करण्याची महत्त्वपूर्ण मागणी करण्यात आली आहे. यासोबतच, बिबट प्रवण क्षेत्रातील रस्त्यालगत सूचना फलक लावणे आणि अलार्म, अलर्ट व्यवस्था कार्यान्वित करण्याची आवश्यकता निवेदनात नमूद केली आहे.

या निवेदनावर RGSS चे समन्वयक म्हणून अरुण चव्हाण, बाळासाहेब घोडके, कल्याण जोर्वेकर, राम अरगडे, मोहसीन रशीद शेख, शंतनू भालेकर, प्रकाश कडलग, सतीश खताळ, अमोल शेलकर, प्रदीप धाडीवाल, अरुण गावित्रे, रवींद्र हासे, अनिल राऊत, सोमनाथ हासे, अक्षय मोहिते, प्रणव नवले, गणेश जगताप, राहुल वर्पे, शशी माघाडे, ॲड. अमित सोनवणे, किशोर खताळ, सुभाष कोकणे, बाळासाहेब जाधव व मोहसीन खलील शेख आदींचा समावेश आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!