महासंगम न्यूज ऑनलाईन वृत्त – संगमनेर
संगमनेर नगर परिषद निवडणुकीसाठी अखेर उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला असून नगराध्यक्षपदासह एकूण आठ जणांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या विधानसभेतील धक्कादायक पराभवानंतर संगमनेरचे राजकारण ‘हॉट’ बनले असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणाऱ्यांची एकूण संख्या आता आठ वर पोहोचली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून, यात शुक्रवारी प्रभाग क्रमांक ११ ब मध्ये शेहबाज शेख या एकमेव उमेदवाराचा अर्ज दाखल झाला होता. यानंतर मंगळवारी नगराध्यक्षपदासाठी एकासह सात जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
नगराध्यक्षपदासाठी ‘यांचा’ अर्ज
नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने या जागेसाठी बेपारी शबाना रईस यांनी शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या पहिल्या उमेदवार त्या ठरल्या आहेत.
नगरसेवक पदासाठी दाखल करण्यात आलेले इतर उमेदवारी अर्ज आणि त्यांचे प्रभाग खालीलप्रमाणे आहेत:
* खरे प्रिया विलास (प्रभाग १३अ)
* डुकरे अमोल राजेंद्र (प्रभाग १३ ब)
* कतारी कविता अमर (प्रभाग १३ अ)
* कतारी पूजा त्रिलोक (प्रभाग ७ अ)
* शिंदे नारायण सावळेराम (प्रभाग ७ ब)
* इनामदार अतिक कमरुद्दीन (प्रभाग ९ अ)
* शेहबाज शेख (प्रभाग ११ ब)
थोरात यांच्या पराभवानंतर राजकारण ‘हॉट’
साधारणत: वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. या मोठ्या राजकीय फेरबदलानंतर संगमनेरच्या राजकारणात मोठे बदल झाले असून, आता नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराचे वातावरण चांगलेच तापले आहे.
अद्याप महाविकास आघाडी आणि महायुतीकडून अधिकृत उमेदवारांची घोषणा झालेली नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे शेवटचे केवळ दोनच दिवस उरले असल्याने, प्रमुख पक्षांकडून कोणाला संधी मिळते, याबद्दलचा सस्पेन्स वाढला आहे.