अकोले – प्रतिनिधी
नवलेवाडी ग्रामपंचायतीच्या कचरा विल्हेवाटीच्या मनमानी कारभाराविरोधात गुरवझाप येथील ग्रामस्थांनी काल, (सोमवार, २४ नोव्हेंबर) तीव्र आंदोलन केले. नगरपंचायत क्षेत्रातील गुरवझाप येथे अवैधरीत्या कचरा टाकल्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आणि वॉर्ड क्र. २ चे नगरसेवक सागर निवृत्ती चौधरी यांच्या नेतृत्वाखाली कचरावाहून नेणारा ट्रॅक्टर अडवून ‘रास्ता रोको’ आंदोलन केले.
नवलेवाडी ग्रामपंचायत नवलेवाडी गावातील संपूर्ण कचरा गुरवझाप येथील ‘अम्युनिटी स्पेस’मध्ये बेकायदेशीरपणे टाकत आहे. गुरवझाप हा परिसर नगरपंचायत क्षेत्रात येत असतानाही, ग्रामपंचायतीकडून हा कचरा सातत्याने येथे टाकला जात आहे.
या गंभीर समस्येबद्दल नगरसेवक सागर निवृत्ती चौधरी व गुरवझाप येथील ग्रामस्थांनी वारंवार लेखी अर्ज व तक्रारी देऊनही नवलेवाडी ग्रामपंचायतीने यावर कोणताही ठोस उपाययोजना केली नाही. कचराभूमीवर आणलेला कचरा कर्मचारी रोज सायंकाळी पेटवून देत असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात विषारी धुराचे साम्राज्य पसरते. यामुळे गुरवझाप परिसरातील नागरिकांचे वास्तव्य व आरोग्य गंभीर धोक्यात आले आहे.
मागील काही दिवसांपूर्वी याच कचरा डेपोमध्ये कचऱ्यातून स्फोट झाला होता. या स्फोटामुळे उडालेल्या आगीच्या ठिणग्या जवळच असलेल्या दत्तू आनंदा चौधरी यांच्या गोठ्यावर पडून जनावरांसाठी ठेवलेली वैरण पेटली होती, यात त्यांचे मोठे नुकसान झाले. या घटनेनंतरही नवलेवाडी ग्रामपंचायतीने नुकसानीची भरपाई देण्याऐवजी ‘उडवा-उडवीचे उत्तर’ देत या प्रकरणातून काढता पाय घेतला होता, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.
सततच्या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी काल आक्रमक पवित्रा घेतला. गुरवझाप येथे कचरा टाकण्यासाठी आलेला ट्रॅक्टर नागरिकांनी एकमताने अडवला आणि त्याला कचरा न टाकताच परत पाठवले.
यावेळी नगरसेवक सागर निवृत्ती चौधरी यांनी नवलेवाडी ग्रामपंचायतीला कडक इशारा दिला. ते म्हणाले, यापुढे गुरवझाप येथे आम्ही नवलेवाडी ग्रामपंचायतीचा कचरा टाकून देणार नाही. जर ग्रामपंचायतीने तातडीने यावर पर्याय शोधला नाही, तर आम्ही सर्व ग्रामस्थ अमरण उपोषण सुरू करू. या ‘रास्ता रोको’ आंदोलनात नगरसेवक सागर निवृत्ती चौधरी यांच्यासह ऋषिकेश चौधरी, बापू चौधरी, अतुल गायकवाड, बाळासाहेब चौधरी, विलास दळवी, बारकू दळवी, गणेश चौधरी, राहुल चौधरी, महेश चौधरी, महेश पाडेकर आदी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामस्थांच्या या आंदोलनामुळे नवलेवाडी ग्रामपंचायतीच्या कचरा विल्हेवाटीचा प्रश्न अधिक गंभीर बनला असून, यावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
