संगमनेर – कांद्याला केवळ 180 रुपये प्रति क्विंटल असा कवडीमोल भाव मिळत असल्याने संतप्त झालेल्या संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील शेतकऱ्यांनी आज, (दि. ११ नोव्हेंबर) महायुती सरकारविरोधात अनोखे व तीव्र आंदोलन केले.
शेतकऱ्यांनी सध्याचे केंद्र आणि राज्य सरकार हे भांडवलदार व श्रीमंतांचे असून ते शेतकरी विरोधी असल्याचा थेट आरोप करत आपला संताप व्यक्त केला. या निषेधाचे स्वरूप अतिशय लक्षवेधी होते— संतप्त शेतकऱ्यांनी तब्बल पाच ट्रॅक्टर कांदे रस्त्यांवरील मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये टाकून निषेध व्यक्त केला. ‘खड्डे बुजवण्यासाठी ही आमच्याकडून सरकारला मदत’ अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी महायुती सरकारचा तीव्र निषेध केला. कांद्यांनी संपूर्ण रस्ता लाल झाल्याने आंदोलनाचे दृश्य लक्षवेधी ठरले.
यावेळी बोलताना बाळासाहेब गायकवाड यांनी सरकारवर टीका केली की, निवडणुकीत कर्जमाफी आणि हमीभावाच्या घोषणा करून आता 180 रुपयांचा भाव देऊन शेतकऱ्यांची थट्टा केली जात आहे. तर विक्रम ओहोळ यांनी महायुतीचे कृषीमंत्री व महसूल मंत्री शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याची टीका करत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले जात होते, याची आठवण करून दिली. तसेच निलेश थोरात यांनी बेरोजगारी आणि शेतीमालाला भाव नसल्याच्या समस्येवर लक्ष वेधत महायुती सरकारला खाली खेचण्याचे आवाहन युवकांना केले.
या आंदोलनात कारखान्याचे माजी चेअरमन बाबा ओहोळ, माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड, गणेश गडगे, सोसायटीचे चेअरमन आबासाहेब थोरात, विक्रम ओहोळ, प्रशांत थोरात, कैलास थोरात, आदींसह अनेक युवक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.