संगमनेर – प्रतिनिधी
श्रीराम फायनान्स लिमिटेड कंपनीला कर्जाच्या हप्त्यापोटी दिलेला धनादेश अनादरीत झाल्याच्या एका महत्त्वाच्या प्रकरणात संगमनेर येथील न्यायदंडाधिकारी न्यायालयाने मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायाधीश जे. व्ही. भेंडे यांच्या न्यायालयाने आरोपी संदीप सावळेराम पगारे (रा. संजयनगर, कोपरगाव) याला चेक रकमेच्या दुप्पट दंड आणि सहा महिने साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे.
आरोपी संदीप सावळेराम पगारे यांनी श्रीराम फायनान्स लिमिटेड कंपनीच्या संगमनेर शाखेकडून कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड करण्यासाठी त्यांनी कंपनीला धनादेश दिला, परंतु तो बँकेत वटला नाही. धनादेश अनादरीत झाल्यानंतरही आरोपीने कायदेशीर मुदतीत कर्जाची रक्कम परतफेड केली नाही. त्यामुळे कंपनीने आरोपीविरुद्ध न्यायालयात तक्रार दाखल करून खटला चालवला.
या खटल्याची सुनावणी चौथे वरिष्ठ व ॲडिशनल मॅजिस्ट्रेट जे. व्ही. भेंडे यांच्या न्यायालयात झाली. उपलब्ध पुरावे आणि गुणदोषांवर विचार करून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले आणि त्याला सहा महिने साधा कारावास ठोठावला. यासह, आरोपीला चेक रकमेच्या दुप्पट रक्कम फिर्यादी कंपनीला एक महिन्याच्या आत अदा करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
विशेष म्हणजे, आरोपीने विहित मुदतीत दंडाची रक्कम भरण्यास कसूर केल्यास, त्याला अतिरिक्त तीन महिने साधा कारावास भोगावा लागेल, अशी शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे.
या खटल्यात फिर्यादी कंपनीच्या वतीने ॲड. राजू बबनराव खरे यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. त्यांना ॲड. विजय देवगिरे, ॲड. सुहास गोर्डे आणि ॲड. सुमय्या सय्यद यांचे सहकार्य लाभले.
