रायगड/महाड:
शिवशंभु प्रतिष्ठान आयोजित संत-स्वराज्य-संविधान या त्रिसूत्री विचारांवर आधारित मोहिमेला संपूर्ण महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड याठिकाणी महाराष्ट्रातील हजारो तरुण, अबाल-वृद्ध, महिला आणि वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मंगळवारी (दिनांक २५) दुपारी महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. त्या क्रांतीस्तंभाजवळ, जिथे डॉ. बाबासाहेबांनी मनुस्मृतीचे दहन केले आणि बहुजन समाजासाठी नवीन जगाची कवाडे खुली केली, त्याच ठिकाणी त्या महान नेत्याला मानवंदना देण्यात आली.
सायंकाळी माँसाहेब जिजाऊ यांच्या समाधीस्थळ पाचाड येथे ह.भ.प. डॉ. सुहास महाराज फडतरे (कोरेगावकर) यांनी कीर्तनाच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांना वैचारिक मेजवानी दिली. ते म्हणाले की, आजही आपण वैचारिक गुलामगिरीत आहोत. चुकीच्या रूढी, परंपरा, अंधश्रद्धा आणि समाजा-समाजात धार्मिक-जातीय तेढ निर्माण करणाऱ्या विषारी विचारांनी आपल्याला ग्रासले आहे. त्यांच्या आहारी न जाता, आपल्या धडावर आपले डोके असावे, म्हणजेच आपण विचार करून वागावे, असा मौलिक संदेश त्यांनी दिला.
संत-स्वराज्य-संविधान या त्रिसूत्री विचारधारेचा धागा त्यांनी समाजाला उलगडून सांगितला. संतांचे विचार, त्यांनी समाजासाठी दिलेले योगदान, छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा बलुतेदार व अठरा पगड जातींना सोबत घेऊन उभे केलेले स्वराज्य आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एकसंध भारत उभा करण्यासाठी तयार केलेली राज्यघटना यांचा वारकरी संप्रदायातील संतांशी असलेला संबंध विविध अभंगांतून समाजाला समजावून सांगितला. हाच संतविचार परिवर्तनाची नांदी ठरू शकेल, असे विचारांनी प्रेरित झालेल्या अनेक तरुणांनी सांगितले.
कैकाडी महाराज मठाचे मठाधिपती ह.भ.प. भारत महाराज जाधव यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना आत्मभान करून दिले. ते म्हणाले, संत-स्वराज्य-संविधान ही त्रिसूत्री विचारधारा समाज मनामध्ये नेटाने रुजवायची आहे. पुढील वर्षीच्या २६ नोव्हेंबरच्या रायगड मोहिमेची तयारी आजपासूनच सुरु करण्याची आपणा सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. एकमेकांना बळ देऊन, संघटित राहून, पेटवलेला हा विचारांचा दीप आपल्या हृदयात सतत तेवत ठेवून संतविचार समाज जागृतीसाठी कशा रीतीने उपयोगी ठरणार आहे, हे आपल्याला सिद्ध करायचे आहे.
यावेळी सर्व जातीधर्मीयांनी प्रार्थना करून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना अर्पण केली. त्यामध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, बौद्ध, लिंगायत असे सर्व धर्माचे लोक सहभागी झाले होते. वारकरी, शेतकरी, आदिवासी, बारा बलुतेदार व अठरा पगड जातीच्या लोकांनी त्या महान राजाला अभिवादन केले. निमित्ताने पोवाडे, आदिवासी नृत्य, साहसी खेळ व शिवकालीन युद्धनीतीचे साहसी प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
संतांना अभिप्रेत असणारे विचार, त्या अनुषंगाने छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेले रयतेचे राज्य (स्वराज्य) व त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेले आपल्या भारताचे संविधान आणि त्यातील विचारांचे संवर्धन, संरक्षण करण्याबाबत शपथ घेण्यात आली. यावेळी रायगडाचा परिसर जयघोषाने दुमदुमून गेला होता.
यावेळी उल्का महाजन, कॉ. धनाजी गुरव, संदीप बर्वे, डी. बी. पाटील, माजी पोलीस आयुक्त सुरेश खोपडे, कैलास देसाई, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज बंडगर, पैगंबर शेख, रमेश पाटील, डॉ. जालिंदर घिगे, ह.भ.प. संदीप महाराज काकड, ह.भ.प. शांताराम महाराज घुले, मछिंद्र कोल्हाळकर, संजय शिंदे, उत्तम पाळंदे, दीपक भांगरे, स्वप्नील धांडे, रमेश वारुळे, पंडित सर, सखाराम गांगड, मीनानाथ उघडे यांनी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
