संगमनेर: बिबट्याच्या वाढत्या दहशतीमुळे संगमनेर तालुका पुन्हा एकदा हादरला आहे. जवळे कडलग गावात शनिवारी सायंकाळी एका अत्यंत दुःखद घटनेत, अवघ्या चार वर्षांच्या सिद्धेश सुरज कडलग या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेसहा ते सात वाजेच्या सुमारास सिद्धेश घराच्या अंगणात खेळत असताना गवतात लपून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर अचानक हल्ला केला. आजीच्या डोळ्यांदेखत बिबट्याने सिद्धेशला फरफटत शेतात नेले. कुटुंबीयांच्या आणि ग्रामस्थांच्या आरडाओरड्यामुळे बिबट्या सिद्धेशला सोडून पळून गेला.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सिद्धेशला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे जवळे कडलग येथील ग्रामस्थ कमालीचे संतप्त झाले आहेत. बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांसाठी त्यांनी वनविभागाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला.
संतप्त ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत ‘जोपर्यंत बिबट्याला पकडले जात नाही किंवा ठार केले जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही,’ अशी मागणी केली.
वनविभागाकडून तातडीने पिंजरा आणि पथक तैनात
घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल सागर सांगळे आणि पोलिस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून बिबट्याला पकडण्यासाठी तातडीने पिंजरे लावण्याचे आणि पथक तैनात करण्याचे आश्वासन दिले. रात्री उशिरापर्यंत ग्रामस्थांचे वनविभागाविरुद्ध आंदोलन सुरू होते. सध्या वनविभाग बिबट्याला पकडण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.
या घटनेमुळे संगमनेर तालुक्यात बिबट्याची दहशत अधिक वाढली असून निष्पाप सिद्धेशला श्रद्धांजली वाहत संपूर्ण गावाने शोक व्यक्त केला आहे.
