महासंगम न्यूज ऑनलाईन – संगमनेर
२०१५ मध्ये संगमनेरचे तत्कालीन नायब तहसीलदार दत्ता जाधव आणि तलाठी पोमल तोरणे यांच्यावर हल्ला करून ट्रॅक्टर अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या हाय-प्रोफाइल प्रकरणातून येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने तिघा आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या महत्त्वपूर्ण खटल्याच्या निकालाकडे संपूर्ण संगमनेरकरांचे लक्ष लागले होते.
जिल्हा व सत्र न्यायाधीश मंदार नेरलेकर यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी मुमताज हसन शेख, आयुब हसन शेख व लतीफ हसन शेख या तिघा आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.
०८ ऑगस्ट २०१५ रोजी सकाळी साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. फिर्यादीनुसार, आरोपी घटनेच्या वेळी वाळूची अवैध वाहतूक करत ट्रॅक्टर-ट्रॉलीसह जात होते. नदीपात्रातून कच्च्या रस्त्यावर आल्यानंतर नायब तहसीलदार दत्तात्रय जाधव आणि तलाठी पोमल तोरणे यांनी पाठलाग करून वाळूने भरलेला ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न केला.
यावेळी आरोपींनी शासकीय कामात अडथळा आणला आणि नायब तहसीलदार जाधव यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने, तलाठी तोरणे यांनी प्रसंगावधान राखून त्यांची मोटरसायकल बाजूला केल्याने नायब तहसीलदारांचे प्राण वाचले. या घटनेनंतर आरोपींनी दोन्ही अधिकाऱ्यांना मारहाण केली. मारहाणीत आरोपींनी नायब तहसीलदार जाधव यांचा मोबाईल हिसकावून घेतला आणि त्यांना गंभीर जखमी केले. नायब तहसीलदार जाधव यांच्या छातीत मुका मार लागला, तर तलाठी तोरणे यांना उजव्या हाताला, कोपराला, डाव्या बरगडीत, पोटात व पाठीत मारहाण करण्यात आली होती.
या गंभीर घटनेप्रकरणी संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि. नं. १८५/२०१५ नुसार आरोपींविरुद्ध भा.दं.वि. कलम ३०७, ३९४, ३५३, ३३२, ५०४, ५०६ सह ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.
जिल्हा व सत्र न्यायाधीश मंदार नेरलेकर यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी पार पडली. या प्रकरणाच्या अनुषंगाने सरकार पक्षातर्फे फिर्यादी तलाठी पोमल तोरणे, नायब तहसीलदार दत्तात्रय जाधव, डॉ. भास्कर भवर, तपास अधिकारी पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण व इतर साक्षीदारांसह एकूण ८ साक्षीदारांची तपासणी करण्यात आली.
तथापि, संगमनेर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश नेरलेकर यांच्यासमोर आरोपींविरुद्ध कोणताही गुन्हा शाबित न झाल्यामुळे, त्यांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपींच्यावतीने ॲड. बाळासाहेब एस. शिंदे यांनी काम पाहिले, तर त्यांना ॲड. अश्विनी पी. खरात यांनी सहकार्य केले.
