संगमनेर (प्रतिनिधी):
संगमनेर तालुक्याला बिबट्यामुक्त करण्यासाठी आणि बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांवर ठोस उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी आज (सोमवार, १५ डिसेंबर) संगमनेरमध्ये भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. गेल्या एका वर्षात १२ नागरिकांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला असून, तालुक्यात वाढलेली बिबट्यांची संख्या मोठी डोकेदुखी ठरली आहे. न्याय मागणीसाठी शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले असताना प्रशासनाचे मात्र असंवेदनशील आणि अनास्थेचे दर्शन झाले.
माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे आणि डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली हा भव्य मोर्चा बस स्थानक ते प्रांत कार्यालय असा निघाला. या मोर्चात बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमावलेल्या सिद्धेश कडलगचे वडील सुरज कडलग यांच्यासह शेकडो नागरिक, विविध पक्षांचे कार्यकर्ते, महिला आणि युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
जन आक्रोश मोर्चा नवीन नगर रस्त्यावरील प्रशासकीय भवनासमोर पोहोचला असता, प्रशासनाने गेटवरच मोर्चा अडवला. विशेष म्हणजे, प्रांताधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारण्यासाठी आचारसंहितेचे कारण देत टाळाटाळ केली, ज्यामुळे आंदोलक चांगलेच संतप्त झाले. प्रशासनाच्या या अनास्थेमुळे आमदार सत्यजित तांबे आणि डॉ. जयश्री थोरात यांनी आक्रमक भूमिका घेतली.
प्रांताधिकारी निवेदन स्वीकारायला येत नसल्याचे पाहून आमदार सत्यजित तांबे यांनी प्रशासनाला जोरदार इशारा दिला. ते म्हणाले, “बिबट्यांच्या दहशतमुक्तीविरोधातील हे आंदोलन राजकीय नाही, यात कुणाचा स्वार्थ नाही. ज्यांचा मुलगा बिबट्याने उचलून नेला, ते सुरज कडलग आणि संपूर्ण समाज न्याय मिळवण्यासाठी एकत्र आला आहे.” त्यांनी आपली भूमिका अधिक स्पष्ट करताना सांगितले, “आम्हाला जास्त आक्रमक व्हायला लावू नका, अन्यथा कार्यकर्ते तुमच्या कार्यालयात घुसतील! प्रशासन जर कुणाच्या दबावाखाली काम करत असेल तर ते खपवून घेणार नाही.”
त्याचबरोबर, डॉ. जयश्रीताई थोरात यांनी राजकीय कार्यकर्ती म्हणून नव्हे, तर एक आई म्हणून आंदोलनात सहभागी झाल्याचे सांगत प्रशासनाची कानउघाडणी केली. त्या म्हणाल्या, “ज्यांचे मुले मृत झाले त्यांची काय अवस्था आहे, हे प्रशासनाने समजून घ्यावे. थोडी तरी संवेदनशीलता दाखवा. आचारसंहितेच्या नावाखाली लपून न बसता प्रांत अधिकाऱ्यांनी खाली येऊन निवेदन स्वीकारावे.”
आमदार तांबे आणि डॉ. थोरात यांचे आक्रमक रूप आणि आंदोलकांनी केलेली जोरदार घोषणाबाजी पाहून अखेरीस प्रशासनाला नमते घ्यावे लागले. आंदोलकांच्या रेट्यापुढे प्रांत अधिकारी अरुण उंडे यांनी तातडीने आंदोलकांमध्ये येऊन निवेदन स्वीकारले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्यासह पोलीस आणि वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.
