अकोले- नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे मूळ सर्वेक्षणाप्रमाणे देवठाण व बोटा स्टेशनसह व्हावी तसेच अकोले तालुक्याला मुंबईशी जोडण्यासाठी शिर्डी-अकोले-घोटी रेल्वे सुरू करावी, या प्रमुख मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. याचाच भाग म्हणून अकोले आणि संगमनेर तालुक्यातील पक्षाचे वर्चस्व असलेल्या ६७ गावांमध्ये व्यापक स्वाक्षरी मोहीम हाती घेण्यात आली आहे.
या मोहिमेच्या नियोजनासाठी नुकतेच अकोले येथील पक्ष कार्यालयात प्रमुख कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबिर पार पडले असून, यामध्ये रेल्वेची उपयुक्तता सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवून आंदोलनाला पाठिंबा मिळवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

पक्षाच्या या मोहिमेत किसान सभा, सीआयटीयू कामगार संघटना, एसएफआय विद्यार्थी संघटना आणि डीवायएफआय युवक संघटना यांनी पुढाकार घेतला असून गावोगाव ही मोहीम राबवण्यासाठी छापील दस्तावेज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. वास्तविक, नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेचा पूर्वीचा मार्ग अचानक बदलून देवठाण व बोटा स्टेशन वगळण्यात आले आणि आता तर संपूर्ण मार्ग पुण्यावरून पुणतांब्याकडे वळवण्यात आला आहे.
या निर्णयामुळे सिन्नर, अकोले, संगमनेर, जुन्नर, आंबेगाव व राजगुरुनगर परिसरातील शेतकरी आणि श्रमिक जनतेवर मोठा अन्याय झाला आहे. हा मार्ग झाल्यास युवकांना शहरात न राहता गावाकडे राहूनच रोजगाराच्या संधी मिळतील आणि शेतीमालाला हक्काची बाजारपेठ उपलब्ध होईल, असा विश्वास माकपने व्यक्त केला आहे.
या हक्काच्या मागणीसाठी आता परिसरातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि संघटना एकवटल्या असून ९ जानेवारी रोजी देवठाण येथे रेल्वे कृती समितीच्या वतीने ‘इशारा मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. तसेच बोटा येथील युवकांनी या मागणीसाठी रास्ता रोको करण्याचा निर्णय घेतला असून या सर्व आंदोलनांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे.
२२ डिसेंबर रोजी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत ठरल्याप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लोकप्रतिनिधींना भेटीची वेळ देऊन या प्रश्नावर त्वरित तोडगा काढावा, अशी मागणी माकपचे जिल्हा सचिव कॉ. सदाशिव साबळे यांनी केली आहे.
