Sat. May 30th, 2026

अकोले (प्रतिनिधी):

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील विरगाव येथे एक अत्यंत दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी घटना घडली आहे. घरापासून काही अंतरावर असलेल्या विहिरीत पडून दोन चिमुकल्या भावंडांचा अंत झाला असून या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. श्रेया पोपट मेंगाळ (वय अडीच वर्षे) आणि पीयूष पोपट मेंगाळ (वय साडेसात महिने) अशी मृत पावलेल्या भावंडांची नावे आहेत. मात्र, ही केवळ दुर्घटना नसून यामागे घातपात असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केल्याने या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलांचे वडील पोपट मेंगाळ यांचा सात महिन्यांपूर्वीच एका अपघातात मृत्यू झाला होता. पतीच्या निधनानंतर मुलांची आई विरगाव येथे आपल्या माहेरी राहत होती. रविवारी सायंकाळी घरापासून ५० मीटर अंतरावर असलेल्या विहिरीत ही दोन्ही मुले पडल्याचे समोर आले. स्थानिकांनी तातडीने शोधमोहीम राबवली असता रात्री उशिरा श्रेयाचा मृतदेह हाती लागला, तर सोमवारी सकाळी पीयूषचा मृतदेह शोधण्यात यश आले. दोन्ही मृतदेह कोतूळ येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

या घटनेबाबत नातेवाईकांनी अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. अडीच वर्षांची श्रेया स्वतः कुपोषित होती, अशा परिस्थितीत ती आपल्या सात महिन्यांच्या भावाला घेऊन विहिरीपर्यंत कशी जाऊ शकते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, मुलांच्या आईने घटनेच्या आदल्या दिवशी इंस्टाग्रामवर जीवनाचा कंटाळा आला असून आता जगायचे नाही, अशी पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमुळे आणि घरातील परिस्थितीमुळे नातेवाईकांचा घातपाताचा संशय बळावला आहे.

सध्या पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. आईने केलेली ती सोशल मीडिया पोस्ट आणि नातेवाईकांचे आरोप या सर्व बाबींचा पोलीस तपास करत असून, शवविच्छेदन अहवालानंतरच या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. एकाच वेळी दोन चिमुकल्यांचा असा अंत झाल्याने विरगावसह अकोले तालुक्यात शोककळा पसरली आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!