महासंगम न्यूज ऑनलाईन – संगमनेर
संगमनेर तालुक्यात बिबट्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत असतानाच, मिर्झापूर परिसरात एक अत्यंत दुर्मिळ आणि आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. मिलनाच्या ओढीने एकत्र वावरणारी नर-मादी बिबट्याची जोडी वनविभागाने लावलेल्या एकाच पिंजऱ्यात एकाच वेळी जेरबंद झाली आहे. सहसा एका पिंजऱ्यात एकच बिबट्या अडकतो, मात्र ही जोडी एकत्र कैद झाल्याने परिसरात या घटनेची मोठी चर्चा सुरू असून वनविभागाचे अधिकारीही अवाक झाले आहेत.
मिर्झापूर येथील ‘गणेश मळा’ परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला होता. काही दिवसांपूर्वीच एका बिबट्याने शेतकऱ्याच्या दुभत्या जनावरावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले होते, ज्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. ग्रामस्थांच्या आक्रमक मागणीनंतर वनविभागाने या परिसरात पिंजरा लावला होता. बुधवारी (१७ डिसेंबर) पहाटेच्या सुमारास, भक्ष्याच्या शोधात किंवा विणीच्या हंगामामुळे एकत्र आलेले हे नर-मादी बिबट्यांचे जोडपे या पिंजऱ्यात अडकले.
वन्यजीव अभ्यासकांच्या मते, बिबट्यांचा कोणताही निश्चित प्रजनन काळ नसला तरी डिसेंबर ते मार्च हा काळ त्यांच्या प्रजननासाठी अत्यंत अनुकूल मानला जातो. याच काळात नर आणि मादी जोडीने फिरताना दिसतात. जेरबंद झालेले हे दोन्ही बिबट्या अंदाजे दीड वर्षांचे असून ते शिकार करण्यास पूर्णपणे सक्षम आहेत.
पहाटे ही जोडी पिंजऱ्यात अडकल्याची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही बिबट्यांना सुरक्षितपणे ताब्यात घेतले असून, त्यांची रीतसर वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. या घटनेमुळे तूर्तास मिर्झापूर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असला तरी, इतर बिबट्यांच्या वावरामुळे दहशतीचे वातावरण कायम आहे.
मिर्झापूरसारख्या लहान गावात सध्या १५ ते १७ बिबट्यांचा वावर असावा, अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. बिबट्यांच्या या वाढत्या संख्येमुळे शेतकरी आणि शाळकरी मुलांमध्ये भीतीचे सावट असून, दिवसाढवळ्या बिबटे दर्शन देत असल्याने नागरिकांना घराची दारे बंद करून राहावे लागत असल्याची व्यथा स्थानिक शेतकरी साहेबराव वलवे यांनी व्यक्त केली आहे.
