संगमनेर –
जगातील सर्व दुःख मलाच आहे असे अनेक जण समजून जीवन दुखी करतात. दुःख विसरा हसत रहा. शोधले तर प्रत्येक ठिकाणी आनंद आहे. व्यंग हे प्रत्येक ठिकाणी आहे. ते शोधण्याची कला अरविंद गाडेकर यांना असून त्यांच्या “मनातलं पानावर” हे पुस्तक वाचकांना आनंद देईल आणि जीवनातील दु:ख विसरून आनंदी राहण्यास मदत करेल, असा विश्वास ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजय कळमकर यांनी व्यक्त केला आहे.
व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर यांच्या “मनातलं पानावर” या पुस्तकाचे प्रकाशन संगमनेर येथे सह्याद्री महाविद्यालयाच्या के. बी. दादा सभागृहात करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते, तर माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, श्रीमती सुवर्णाताई मालपाणी, अनिल देशपांडे, ज्येष्ठ पत्रकार किसन हासे यांच्यासह शहरातील अनेक साहित्यिक आणि प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या.
डॉ. संजय कळमकर म्हणाले, संगमनेरमध्ये साहित्य आणि जाणकार राजकीय नेतृत्वाची मोठी परंपरा आहे. प्रत्येक व्यक्तीला आपल्या दृष्टिकोनानुसार जग दिसते. व्यंगचित्रे समाजातील विसंगती शोधून त्यातून आनंद निर्माण करतात. प्रत्येकाने आपलं दु:ख जगाच्या तुलनेत क्षुल्लक आहे हे समजून आनंदी राहायला हवं. कोरोना संकटात आपल्याला जवळची माणसे कळाली मात्र तरीही आपण सुधारलो नाही. प्री-वेडिंग नावाचा प्रकार हा अत्यंत धोकादायक असून तो बंद झाला पाहिजे, असं सांगतानाच कळमकर यांनी विनोदपूर्ण किस्से सांगून उपस्थितांना हसवले.
डॉ. सुधीर तांबे यांनी अरविंद गाडेकर यांचे परिश्रम, सातत्य आणि प्रामाणिकपणा या गुणांचे कौतुक केले. व्यंगचित्र ही अवघड कला असून गाडेकर यांनी त्यातून आपले मोठे नाव केले आहे. सततचे परिश्रम सातत्य आणि प्रामाणिकपणा हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांच हे पुस्तकही लोकप्रिय होईल.
दुर्गाताई तांबे म्हणाल्या, आर. के. लक्ष्मण यांनी व्यंगचित्रकलेला नवी ओळख दिली, त्याचप्रमाणे गाडेकर यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून संगमनेरचे नाव राज्यात पोहोचवले.
सुवर्णाताई मालपाणी म्हणाल्या, गाडेकर यांचे साहित्य हे मनाला आनंद देणारे आणि हसवणारे आहे. यावेळी डॉ. संतोष खेडलेकर, साहित्य परिषदेचे दिलीप उदमले, रमेशकाका सराफ, निलेश पर्बत, सुप्रिया गवांदे, पुष्पाताई निऱ्हाळी, अनघा खेडकर, मनोज साकी, सुरेश परदेशी, मुकुंद डांगे, प्राचार्य ज्ञानेश्वर गोंटे, प्रा. शशांक गंधे, बाळकृष्ण महाजन, महेश गोडसे, विजय दीक्षित, शेख इदरीस, रामनाथ सातपुते, अनुश्री खैरे, मंगल पेटकर आदीसह संगमनेरच्या साहित्य क्षेत्रातील अनेक अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल सोमणी यांनी केले, तर सूत्रसंचालन नामदेव कहांडळ व यश गाडेकर यांनी केले. ज्ञानेश्वर राक्षे यांनी आभार मानले.

गाडेकर यांचे लिखाण तणावमुक्त करणारे – माजीमंत्री बाळासाहेब थोरात
व्यंगचित्रांमधून भावना व्यक्त करण्याबरोबर मार्मिक टीका करणारे गाडेकर यांचे लिखाण हे हलके फुलके असून आनंद निर्माण करणारे आहेत. सोशल मीडियाच्या जमान्यातही वाचकांचा मोठा वर्ग असून नागरिकांच्या धावपळीच्या जीवनात त्यांना तणाव मुक्त करणारे गाडेकर यांचे लिखाण असल्याचे कौतुक राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुभेच्छा देऊन केले आहे.
