Wed. Apr 1st, 2026
Judge’s gavel, Themis sculpture and collection of legal books on the brown background.

संगमनेर – प्रवरा चिट्स प्रा. लि. कंपनीच्या भिशी व्यवहारातील धनादेश अनादरीत झाल्याप्रकरणी संगमनेर कोर्टाने आरोपी सुर्यभान हरीभाउ नाईकवाडी यांना दोषी ठरवत एक महिन्याचा साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. यासोबतच, कोर्टाने थकीत असलेली रक्कम ४,७३,९०० रुपये महिनाभराच्या आत फिर्यादी कंपनीला देण्याचेही आदेश दिले आहेत.

४ थे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा अतिरीक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे. व्ही. भेंडे यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्टचे कलम १३८ नुसार दाखल झालेला हा खटला मागील आठ वर्षांपासून सुरू होता.

कंपनीच्या भिशी योजनेचा सदस्य असलेल्या नाईकवाडी यांनी दि. १२/०५/२०१३ रोजी भिशीची रक्कम उचलली होती. मात्र, एप्रिल २०१४ ते ऑगस्ट २०१६ या कालावधीत त्यांनी मासिक हप्ते भरले नाहीत, ज्यामुळे मूळ रक्कम आणि व्याज धरून त्यांची एकूण रु. ४,७३,९००/- इतकी रक्कम थकीत झाली. ही रक्कम देण्यासाठी आरोपीने दिलेला धनादेश क्र. ७९८७७२ हा ‘फंड्स इनसफिशियंट’ या कारणामुळे दि. ३०/०७/२०१६ रोजी अनादरीत झाला. कायदेशीर नोटीस देऊनही आरोपीने रक्कम न भरल्यामुळे कंपनीने ॲड. कुलभूषण महाले यांच्यामार्फत कोर्टात फिर्याद दाखल केली होती.

न्यायालयात आरोपीच्या वकिलांनी, कंपनीने सुरक्षिततेसाठी कोरे धनादेश घेतले होते आणि अतिरिक्त व्याज वसूल करण्यासाठी त्यांचा गैरवापर करत खोटी फिर्याद दाखल केल्याचा बचाव केला. तथापि, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आणि फिर्यादी पक्षाने धनादेश देणे, अनादरीत होणे आणि कायदेशीर नोटीस पाठवणे हे मुद्दे सिद्ध केल्याचे आढळले. आरोपीने धनादेशावरील सही नाकारली नाही, तसेच कायदेशीर कर्ज थकीत असल्याचेही सिद्ध झाले. यामुळे न्यायालयाने आरोपीला कलम १३८ नुसार दोषी ठरवले.

न्यायाधीश भेंडे यांनी आरोपीला एक महिन्याचा साधा कारावास आणि ४,७३,९०० रुपये एक महिन्याच्या आत फिर्यादीस देण्याचे आदेश दिले. आरोपीने ही रक्कम न भरल्यास त्याला आणखी एक महिना साध्या कारावासाची शिक्षा भोगावी लागेल.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!