Sat. May 30th, 2026

महासंगम न्यूज ऑनलाईन – संगमनेर

गेल्या काही दिवसांपासून संगमनेरच्या राजकीय वर्तुळात अत्यंत चर्चेचा आणि दोन्ही आमदारांच्या ‘पत्रक युद्धाचा’ विषय ठरलेली मालमत्ता करावरील शास्ती माफी अखेर प्रत्यक्षात उतरली आहे. संगमनेर नगरपालिकेच्या हद्दीतील थकबाकीदार मिळकतधारकांसाठी राज्य शासनाच्या निर्णयानुसार ‘अभय योजना’ लागू करण्यात आली असून, यामुळे शहरातील हजारो मालमत्ताधारकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

या योजनेअंतर्गत मालमत्ता करावरील थकीत व्याजात (शास्ती) तब्बल ५० टक्के सवलत जाहीर करण्यात आली असून, प्रशासकीय पातळीवर झालेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. नवनिर्वाचित नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांनी पदभार हाती घेताच त्यांच्या कार्यकाळातील हा पहिलाच मोठा निर्णय ठरला असून गेल्या अनेक वर्षांपासून संगमनेरकरांना अपेक्षित असलेला निर्णय तांबे यांच्या कार्यकाळात मार्गी लागला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून या योजनेच्या अंमलबजावणीवरून शहरात मोठे राजकीय नाट्य पाहायला मिळाले होते. दोन्ही आमदारांनी या योजनेचे श्रेय घेण्यासाठी आपणच शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केल्याचा एकमेकांवर पत्रकांद्वारे जोरदार निशाणा साधला होता, ज्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. मात्र, आता नगरपालिकेने महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत अधिनियम १९६५ च्या कलम १५० (क) मधील तरतुदीनुसार अधिकृत जाहीर आवाहन केल्यामुळे या वादावर अखेर पडदा पडला आहे.

या योजनेच्या स्वरूपानुसार, १९ मे २०२४ पर्यंत ज्या मिळकतधारकांची मालमत्ता कराची शास्ती थकबाकी आहे, त्यांनाच या ५० टक्के माफीचा लाभ घेता येईल. ही योजना केवळ एकदाच लागू करण्यात आली असून लाभार्थ्यांनी ५० टक्के व्याज वगळता उर्वरित संपूर्ण थकबाकीची रक्कम एकरकमी भरणे अनिवार्य आहे.

विशेष म्हणजे, ३१ मार्च २०२६ पर्यंतच या योजनेचा लाभ घेता येणार असून त्यानंतर कोणतीही सवलत लागू राहणार नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सध्या सन २०२५-२६ च्या मालमत्ता कराची बिले नागरिकांना वाटप करण्यात आली आहेत, त्या पार्श्वभूमीवर जुन्या थकबाकीवरील व्याजाचा बोजा कमी करण्याची ही सुवर्णसंधी असल्याचे नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांनी नमूद केले आहे.

मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी तांत्रिक बाबी स्पष्ट करताना सांगितले की, १९ मे २०२४ नंतरच्या थकबाकीवर ही योजना लागू होणार नाही, त्यामुळे नागरिकांनी मुदतीपूर्वी आपल्या कराचा भरणा करून शहराच्या विकासकामांना सहकार्य करावे.

राजकीय श्रेयवादाच्या लढाईत अडकलेली ही योजना अखेर मार्गी लागल्याने संगमनेरच्या करदात्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून डॉ. मैथिली तांबे यांची नगराध्यक्षा म्हणून ही दमदार इनिंगची सुरवात मानली जात आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!