संगमनेर, प्रतिनिधी –
व्यावसायिक कामासाठी घेतलेली हातउसनवार रक्कम परत करण्यासाठी दिलेला धनादेश (चेक) बँकेत न वटल्याने, संगमनेर येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी चं. प्र. रघुवंशी यांच्या न्यायालयाने एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाला दोषी ठरवून कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्ञानेश्वर माधव वर्पे (वर्पे इन्श्युरन्स अँड मल्टी सर्विसेस) आणि आरोपी सागर भाऊसाहेब गोपाळे (श्री स्वामी समर्थ ट्रान्सपोर्ट) यांची विम्याच्या कामामुळे ओळख होती. आरोपीने आपल्या व्यवसायासाठी जून २०२२ मध्ये वर्पे यांच्याकडून १ लाख २५ हजार रुपये उसने घेतले होते. ही रक्कम परत करण्यासाठी आरोपीने दिलेला चेक ‘खाते बंद’ असल्याच्या शेऱ्यासह दोनदा परत आला. कायदेशीर नोटीस पाठवूनही रक्कमेची पूर्तता न झाल्याने अखेर फिर्यादीने न्यायालयात धाव घेतली.

न्यायालयीन सुनावणी दरम्यान आरोपीने पैसे परत केल्याचा दावा केला, मात्र त्याबाबत कोणताही ठोस पुरावा किंवा बँक पावती सादर करता आली नाही. उलटतपासणीत आरोपीने तडजोड करण्याची तयारी दर्शवल्याने रक्कम देणे बाकी असल्याचे सिद्ध झाले. दोन्ही बाजूंचे पुरावे तपासून न्यायालयाने सागर गोपाळे याला कलम १३८ अन्वये दोषी ठरवत ३ महिने साध्या कारावासाची शिक्षा आणि २ लाख रुपये दंड ठोठावला आहे. दंडाच्या रक्कमेपैकी १ लाख ७५ हजार रुपये फिर्यादीला देण्याचे आदेश देण्यात आले असून दंड न भरल्यास आरोपीला अतिरिक्त एक महिना कारावास भोगावा लागणार आहे. या प्रकरणात फिर्यादीतर्फे ॲड. व्ही. आर. पगारे यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. सुनिता जाधव, ॲड. मोहिनी जगताप व ॲड. मनीषा गुंजाळ यांनी मदत केली.
