संगमनेर: प्रतिनिधी
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली ‘विकसित आणि वैभवशाली’ शहर म्हणून ओळख असलेल्या संगमनेरला गेल्या वर्षभरापासून गुन्हेगारीचे ग्रहण लागले आहे. शहरातील वाढती अमली पदार्थांची तस्करी, दहशत आणि चोऱ्यांच्या वाढत्या घटनांमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, ही गुन्हेगारी तातडीने थांबवावी या मागणीसाठी माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे आणि नगराध्यक्षा डॉ. मैथिलीताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरच्या महिलांनी पोलीस प्रशासनाला साकडे घातले आहे.

या संदर्भात आज शहर पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात महिलांनी शहरातील विदारक परिस्थिती मांडली असून, अवैध अमली पदार्थांच्या विक्रीमुळे शालेय व महाविद्यालयीन तरुण पिढी व्यसनाधीनतेच्या आहारी जात असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तसेच शहरात चोरी, मारहाण आणि भरदिवसा दहशत निर्माण करणाऱ्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून महिला आणि सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या गुन्हेगारीला पायबंद घालण्यासाठी पोलिसांनी तातडीने गस्त वाढवावी, संशयास्पद हालचाली करणाऱ्यांवर कडक पाळत ठेवावी आणि अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या माफियांवर कठोर कायदेशीर कारवाई करून गुन्हेगारांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी बोलताना माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्याची राज्यात एक वेगळी प्रतिष्ठा आहे, मात्र अलीकडच्या काळात शहरात ज्या प्रकारे गुन्हेगारी आणि ड्रग्जचा शिरकाव झाला आहे, ते अत्यंत दुर्दैवी आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी आता अधिक कठोर होण्याची गरज असून दोषींना पाठीशी न घालता त्यांच्यावर तातडीने कारवाई व्हावी. पोलीस निरीक्षक बारवकर यांनी महिलांच्या भावना जाणून घेत, या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन ठोस पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे.
या आंदोलनात नगरसेविका दिपाली पंचारिया, सरोजिनी पगडाल, वनिता गाडे, नंदा गरुडकर, अनुराधा सातपुते, सीमा खटाटे, विजया गुंजाळ यांच्यासह मंगल कासार, सुषमा भालेराव, मीना सोसे, उज्वला पगार, मुमताज सौदागर, शोभा तुपे, मोहिनी बनसोडे, वैशाली कोल्हे, सोनिया थोरात, शिवानी गाडे, सुविधा आरसिद्ध, सुनीता कांदळकर, वर्षा भोंडे, मनीषा शिंदे, ज्योती दारोळे, कीर्ती मुळे, दीपा कलंत्री, मीनल निऱ्हाळी, कल्पना कुटे, स्नेहलता एखंडे आणि कोमल दायमा आदींसह शेकडो महिला उपस्थित होत्या.
